शाळा, महाविद्यालयात सीसीटीव्ही बंधनकारक: पोलीस अधीक्षक संदीप पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

 

पुणे जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालयात सीसीटीव्ही लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यात ज्या शाळा, महाविद्यालय सीसीटीव्ही बसविणार नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. या पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पाखले, संदीप जाधव देखील उपस्थित होते.

बारामती येथे रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून आकांक्षा दरेकर या अकरावीतील मुलीने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. यापाश्र्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी आता कडक भूमिका घेतली आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी आता निर्भया पथक आणि दामिनी पथकांची संख्या दुप्पट केली आहे. तर प्रत्येक गावात महिला सुरक्षा समिती तयार करण्यात येणार असून त्यांची सदस्य संख्या १०० पर्यंत वाढविण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2f277938-a886-11e8-b5eb-9fd93570990c’]

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, बारामती शहरात सुमारे १२५ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील नगरपालिका यांनी त्यांच्या क्षेत्रात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत याकरिता पत्रव्यवहार करण्यात येत आहे. गणेश उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर गणपती मंडळांनीही सीसीटीव्ही लावावेत. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील प्रत्येक शाळेत विद्यार्थीनी सुरक्षा समिती तयार करण्यात येणार असून दर महिन्याला त्याची बैठक आयोजित केली जाईल. प्रत्येक शाळेत असणारी तक्रार पेटी ही वेळोवेळी तपासून विद्यार्थिनींच्या तक्रारींवर प्राधान्यायने कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थिनीकडे एका पुरुष पोलीस कर्मचारी आणि महिला कर्मचारी यांचा मोबाईल नंबर असेल आणि कोणत्याही प्रसंगी ती विद्यार्थिनी संबंधित पोलीस काका, पोलीस काकी सोबत संपर्क करु शकेल.

बारामती येथे आत्महत्या केलेल्या मुलीने पोलिसांकडे लेखी अथवा तोंडी तक्रार दिलेली नव्हती. त्यामुळे यापुढील काळात विद्यार्थिनी सोबत समन्वय साधला जाईल. निर्भया स्कॉडचे काम सुधारण्यासाठी आठ पथकांची १६ पथके करण्यात येत आहे. प्रत्येक पथकास तीन गोपनीय कॅमेरे देण्यात आले आहे. तर, १२ दामिनी पथकांची संख्या २४ करण्यात आली आहे. तसेच कारवाई करण्यात आलेल्या तरुणांना सुधारण्यासाठी समुपदेशन पथके तयार करण्यात आली आहे. महिला सुरक्षा दृष्टीने पुणे ग्रामीण जिल्हयात २३६० हॉटस्पॉट निवडण्यात आले आहेत.