गुन्हे शाखेत फेरबदलाची शक्यता ?

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अकार्यक्षम पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी वेळोवेळी केल्या आहेत. याच बरोबर गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांची दखल न घेणे, तक्रार, आरोपी यांना मारहाण करून पैसे उकळणे अश्यांवरही योग्य कारवाई केली आहे.

नुकतेच गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरीच्या संशयावरून एका कामगाराला ताब्यात घेऊन अमानुष मारहाण केली. तसेच त्या कामगाराच्या सुटकेसाठी लाखो रुपये उकळले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन एका पोलिसाला अटक केली आहे. या प्रकरणानंतर गुन्हे शाखेत काम करणाऱ्या सर्वांचे ‘सर्व्हिस रेकॉर्ड’ तपासण्याचे आदेश पोलीस आयुक्तानी दिले आहेत. लवकरच गुन्हे शाखेतही फेरबदल होऊननवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गुन्हे शाखेतील सहायक उपनिरीक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी एका तरुणाला ताब्यात घेत बेदम मारहाण केली. तसेच त्याला विजेचा शॉक देखील दिला. तरुणाकडे काहीच मुद्देमाल सापडला नसल्याने त्यास ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करुन त्याच्याकडून आठ लाख रुपये घेतले. हे प्रकरण पोलीस आयुक्तांकडे गेल्याने त्यांनी थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

या प्रकरणाची आयुक्त पद्मनाभन यांनी गंभीर दखल घेतली आहे. यापूर्वी गुन्हे शाखेमध्ये नियुक्ती करताना कोणतेही निकष वापरले नव्हते. इच्छुक कर्मचाऱ्यांचे अर्ज मागवून थेट नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या नियुक्त्यांमध्ये चुका झाल्याचे नाळे प्रकरणामुळे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाची माहिती मागवली आहे.

वर्षानुवर्षे गुन्हे शाखा, पोलीस ठाण्यातील तपासी पथक यातच फक्त काम करणाऱ्या आणि गुन्हेगारांशी थेट संबंध असणाऱ्या पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयामुळे पोलीस खात्यायील चांगल्या आणि होतकरू पोलिसांना संधी मिळणार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.