पोलिस अधिकाऱ्यावर (API) जीवघेणा हल्ला करणारा आरोपी महापौर ?

धुळे: पोलीसनामा ऑनलाईन –भाजपने धुळे महापालिकेत ५० जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. धुळे महापालिका महापौर, उपमहापौर निवडणुकीत नामांकन दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. भाजपकडून महापौरपदासाठी चंद्रकांत सोनार यांनी नामांकन दाखल केले आहे. तर उपमहापौर पदासाठी कल्याणी अंपळकर यांनी नामांकन दाखल केले आहे. महापौर पदासाठी दावेदार असणारे चंद्रकांत सोनार यांच्यावर एका पोलीस अधिकाऱ्यावर जिवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये ते आरोपी आहेत.

धुळे महापालिकेत 50 जागा मिळवत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असल्याने महापौरपदी चंद्रकांत मधुकर सोनार, उपमहापौरपदी कल्याणी सतीश अंपळकर यांची निवड निश्चित झाली आहे. आता केवळ त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी राहिली आहे. महापौरपदासाठी काँग्रेसतर्फे  खान सद्दीन हुसेन रहेमतुल्लाह यांनी तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मंगल अर्जुन चौधरी यांनी नामनिर्देशन दाखल केलं आहे.

हल्ला

धुळे महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीसाठी 31 डिसेंबर रोजी बोलावण्यात आलेल्या विशेष महासभेत महापौरपदी भाजपचे प्रभाग क्रमांक 9 (क) चे नगरसेवक चंद्रकांत मधुकर सोनार, उपमहापौरपदी भाजपच्या प्रभाग क्रमांक 14 (क) च्या नगरसेविका कल्याणी सतीश अंपळकर या दोघांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल.

चंद्रकांत मधुकर सोनार यांच्यासह त्यांचा मुलगा देवा सोनार या दोघांनी 26 मार्च 2013 रोजी होळीच्या दिवशी तत्कालीन एपीआय धनंजय पाटील यांच्यावर जुने धुळे भागात प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.