कोंढव्यात तरुणाकडून ९२ हजारांचा ६१३ ग्रॅम चरस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या मुंबईतील एका तरुणाला कोंढवा पोलिसांनी पकडून त्याच्याकडून ९२ हजार १०० रुपयांचा ६१३ ग्रॅम चरस जप्त केला आहे.

शेहबाज अहमद शहाबुद्दीन अन्सारी (वय २६, रा. मुंबई, मुळे बीजनौर, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई कोंढव्यातील शितल पेट्रोलपंपाजवळ मंगळवारी रात्री दहा वाजता करण्यात आली.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले की, कोंढवा पोलीस ठाण्यातील हवालदार इक्बाल शेख यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक संतोष शिंदे, हवालदार राजस शेख, विलास तोगे, सचिन शिंदे, संजय कदम, योगेश कुंभार, वणवे, पृथ्वीराज पांडुळे, सुरेंद्र कोळगे, अझीम शेख, आदर्श चव्हाण, उमाकांत स्वामी, उमेश शेलार या पथकाने कोंढव्यातील शितल पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी रात्री दहा वाजता सापळा रचला. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण तेथे थांबलेला दिसला. पोलिसांनी त्याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ९२ हजार १०० रुपयांचा चरस, मोबाईल व ५४० रुपये असा ९५ हजार ६४० रुपयांचा माल जप्त केला. कोंढवा पोलीस ठाण्यात अन्सारी विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे महादेव कुंभार यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने ही कारवाई केली.