महागड्या कार चोरणारे गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे : पोलीनासामा ऑनलाईन – महागड्या कार चोरून त्यांचे नंबर बदलून विक्री करणाऱ्या मुंबईतील दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट – ३ च्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई रविवारी (दि.६) वारजे माळवाडी येथील म्हाडा कॉलनी ए ब्लॉक समोर करण्यात आली.

गौरव नंदकुमार वाडकर (वय-२० रा. कोपर खैरणे, नवी मुंबई), दिपक चंद्रकांत शेडगे (वय-२८ रा.  गुरुकृपा अपार्टमेंट, कोपर खैरणे, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट – ३ चे पोलीस हवालदार मेहबुब मोकाशी यांना दोनजण वारजे माळवाडी येथील म्हाडा कॉलनी ए ब्लॉक समोर स्वस्तामध्ये कार विक्री करण्यासाठी थांबले असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेली शेवरोलेट एन्जॉय कार (एमएच ११ बीवाय ०८५८) ताब्यात घेतली. त्यांच्याकडे कारची चौकशी केली असता त्यांनी दोन महिन्यांपूर्वी वाशी येथून चोरल्याची कबुली दिली. कारच्या नंबरची तपासणी केली असता दोघांनी कारचा नंबर बदलून विक्री करत असल्याचे समोर आले. ताब्यात घेण्यात आलेल्या कारचा मुळ नंबर एमएच ०४ एचवाय ०४४९ असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपींना अटक करुन ५ लाख ५० हजार रुपयांची कार जप्त केली आहे.

ही कारवाई सहायक पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, गुन्हे शाखा – १ समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक निकम, पोलीस उप निरीक्षक अजय म्हेत्रे, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलीस फौजदार किशोर शिंदे, पोलीस हवालदार मेहबुब मोकाशी, रामदास गोणते, शकील शेख, पोलीस नाईक संदिप तळेकर, विल्सन डिसोझा यांच्या पथकाने केली.