आरक्षणाची गाजरं दाखवून फसवणूक केली जाते आहे – छगन भुजबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन- देशात आरक्षणाच्या नावाखाली गाजरं दाखवून जनतेची फसवणूक केली जात आहे. तुम्ही चहा विकत होता ते ठीक होतं मात्र देश विकू नका म्हणजे झालं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनी निफाड सायखेडाच्या जाहीर सभेत पंतप्रधानांना लगावला.सरकारने अनेक आश्वासने देवून सत्ता मिळविली मात्र त्यांना दिलेल्या अश्वासनाचे काय झाले याबाबत सरकारला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा मोडतोड करून उत्तरे फिरविली जात आहेत असेही छगन भुजबळ यांनी सांगितले. कांद्याचे दर पडल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कांद्याचे फुकट वाटप केले. त्यावेळी कांदा कुरिअरने मुख्यमंत्र्यांना पाठवला मात्र त्यावर सरकारला काहीही फरक पडला नाही.उलट फुकट मिळतोय म्हणून घेवून टाकला असा टोलाही छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

आघाडी सरकारच्या काळात कांद्याला ३५० रुपये अनुदान दिले होते मात्र आता केवळ २०० रुपये अनुदान सरकारने दिले. कांद्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही असा आरोप आमदार छगन भुजबळ यांनी केला.६८ कोटी रुपये आणून नांदूरमध्यमेशवर धरणाला दरवाजे बसविल्याने आज सायखेड्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.या सरकारला एवढी भीक लागलीय की, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, घोटी या परिसरात तांदुळ हे मुख्य पीक आहे परंतु या तांदुळ पीकासाठी बारदाने खरेदी करायला पैसे या सरकारकडे नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे तांदुळपीक उचलले गेले नाही. हे सरकार नुसते विकासाच्या गप्पा मारतेय. अरे अगोदर बारदाने खरेदी करा. आता यांनी बारदाने खरेदी केली नाहीत तर यांचे बारदान करुन टाका असा इशाराही  आमदार छगन भुजबळ यांनी दिला.

नारपारच्या पाण्याचा एक थेंबही गुजरातला देणार नाही. भले शहीद झालो तरी हा लढा सोडणार नाही. या बिनकामी सरकारला धडा शिकवा आणि परिवर्तनाच्या माध्यमातून या सरकारला खड्डयात गाडा असा स्पष्ट इशाराही आमदार छगन भुजबळ यांनी दिला.
नुसत्या घोषणा करणाऱ्या या भाजप सरकारची नुसती नौटंकी सुरु आहे असा आरोपही आमदार छगन भुजबळ यांनी केला.

या सरकारला दिशाभूल करायला चांगलं जमतं – अजित पवार

या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नाही परंतु दिशाभूल करायला चांगलं जमतं अशा शब्दात भाजप सरकारचा राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी समाचार घेतला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यातील पाचवी जाहीर सभा निफाड सायखेडा येथे प्रचंड गर्दीत पार पडली. आम्ही कधीही शेतकऱ्यांना देण्यासाठी हयगय केली नाही. या भागात विजेच्या सबस्टेशनसाठी आम्ही भरघोस निधी दिला. या सरकारने शेतकऱ्यांना काय दिले ? इथला पालकमंत्री पण जळगाव जिल्ह्यातून आयात केला आहे. त्याला नाशिकचे प्रश्न काय कळणार ? नाशिकच्या लोकांनी भाजपला मतदान केलं नव्हतं का ? मग त्यांना हक्काचा पालकमंत्री का मिळाला नाही ?असा सवाल अजितदादा पवार यांनी केला. राज्याच्या मंत्रीमंडळात एकही मंत्री शेतकरी नाही, हे गिरीश महाजन बिबट्याला मारण्यासाठी बंदुक झळकावतात ही सर्व नौटंकी सुरू आहे अशा शब्दात अजितदादा पवार यांनी समाचार घेतला.
या सरकारने काहीच शिल्लक ठेवले नाही, जिल्हा बँका उद्ध्वस्त केल्या. पुलोदच्या काळात तुम्ही सर्वांनी पवार साहेबांना साथ दिली. तुम्ही ठरवले तर ते आताही घडू शकतं ते तुमच्या मनावर आहे अशी साद निफाड सायखेडाच्या जनतेला घातली. शासनाच्या विविध कामासाठी इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातात, जर बटनं नीट दाबली तर जमिनी वाचतील जर नाही दाबली तर जमिनी जातील असा खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थितांना केला.

भाजपकडे अमाप पैसा झाला आहे. ते सत्तेसाठी काहीही करू शकतात, कर्नाटकात आमदार विकत घेण्यासाठी भाजपतर्फे करोडो रुपये फेकले जात होते. राज ठाकरे मुंबईमध्ये मध्यतंरी भेटले होते. त्या़ंचे नगरसेवक पाच पाच कोटी रुपयाला फोडले असे राज म्हणाल्याची आठवण सांगतानाच हा पैशांचा माज उतरवण्यासाठीच ही परिवर्तन यात्रा असल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.
भाजपचे आमदार मुली पळवण्याची भाषा करत आहे. तुमच्या घरातील मुलगी आहे का ? त्या आमदाराचे नाव राम कदम आहे त्याचे राम नव्हे रावण नाव ठेवायला हवे होते. मध्यंतरी भाजपचे आमदार धस म्हणाले की, उत्तर भारतीय राहतात इकडे आणि मुल़ तिकडे जन्माला येतात. जीभ दिली म्हणून काहीही बोलायचे का ?अशा वाचाळवीर आमदारांचा अजितदादा पवार यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा आजचा सहावा दिवस असून परिवर्तन यात्रेच्या दुसर्‍या टप्प्याची सुरुवात नाशिक जिल्हयातून झाली असून निफाड सायखेडा शहरात पाचवी सभाही प्रचंड गर्दीमध्ये पार पडली.सभेत माजी आमदार दिलीपराव बनकर, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपले विचार मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या दुसर्‍या टप्प्यातील सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दिलीपराव बनकर, आमदार जितेंद्र आव्हाड,आमदार दिप्ती चव्हाण, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्षा डॉ. भारती पवार, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे,सेवादल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर,विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, जिल्हाध्यक्ष नानासाहेब पगार,महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बेलकवडे जलसिंचन सेलचे राजेंद्र जाधव, प्रदेश पदाधिकारी बापू भुजबळ, निफाड, सायखेडा येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.