शिक्षण संस्था चालकांची फसवणूक, पुण्यातील नामवंत वकिल दांपत्य फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रोझरी एज्युकेशन ग्रुपचे विनय आरान्हा व विवेक आरान्हा यांच्या नावाने खोटे अ‍ॅफेडेव्हिट तयार करुन त्यावर आरान्हा यांची खोटी सही करुन नोटरी नोंद केली. आरान्हा यांनी दाखल केलेल्या दाव्यामध्ये त्यांचे खोटे कागदपत्र सादर करुन त्यांची फसवणूक केली. तसेच एकतर्फी न्यायालयीन आदेश मिळवण्याच्या उद्देशाने खोटे कागदपत्र सादर करुन दिवाणी न्यायालयाची देखील दिशाभुल केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अ‍ॅड. प्रियंका दिलीप शेलार (वय-३४ रा. पिंपरी) यांना अटक केली आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी अ‍ॅड. प्रियंका शेलार यांना बुधवारी (दि. २६) पिंपरीमधून सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अटक केली. तर त्यांचे साथिदार आणि पुण्यातील नामवंत वकिल सागर उर्फ राजाभाऊ सुर्य़वंशी (रा. साऊथ मेन रोड, कोरेगांव पार्क) आणि त्यांची पत्नी शितल किशनचंद तेजवानी हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोझरी एज्युकेशन ग्रुप ही शिक्षण संस्था आर्थिक दृष्ट्या डबाघईला आल्याने आरान्हा यांनी त्यांचे आर्थिक सल्लागार अ‍ॅड. सागर सुर्य़वंशी यांच्याकडे सल्ला मागितला. फिर्यादी हे सुर्यवंशी यांच्याकडून आर्थिक मदत घेत असल्याने त्याने सर्व आर्थिक व्यहारामध्ये अडीअडचणी निर्माण झाल्यास त्या सोडवण्यासाठी पत्नी शितल तेजवानी त्यांची मदत घेण्यास सांगितले. शितल तेजवाणी यांनी आरान्हा यांना सहकार्य करण्यासाठी व सुवीधा पुरविण्यासाठी फॅसीलीटी अ‍ॅग्रीमेंट जबरदस्तीने करुन घेतले.

आरान्हा यांना आर्थिक मदत करण्यासाठी शितल तेजवानी यांनी सेवा विकास बँक पिंपरी शाखेकडून ९ कोटी रुपये कर्ज काढून दिले. या बदल्यात त्यांनी ३० टक्के कमीशन मागितले होते. फिर्यादी यांनी कमीशन देण्यास नकार देवून २०१५ मध्ये झालेला करार रद्द केला. त्यामुळे तेजवाणी यांनी आरान्हा विरुद्ध शिवाजीनगर न्यायालयात दावा दाखल केला.

अ‍ॅड सुर्यवंशी आणि शितल तेजवानी यांनी त्यांची सहकारी प्रियंका शेलार यांना आरान्हा यांचे खोटे वकिलपत्र दिले. तसेच आरान्हा यांची खोटी सही करुन नोटरी नोंद केली. आरान्हा यांनी दाखल केलेल्या दाव्यामध्ये त्यांचे खोटे कागदपत्र सादर करुन त्यांची फसवणूक केली. तसेच एकतर्फी न्यायालयीन आदेश मिळवण्याच्या उद्देशाने खोटे कागदपत्र सादर करुन दिवाणी न्यायालयाची देखील दिशाभुल केली. प्रियंका शेलार यांना अटक करुन न्यायालयात सादर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अ‍ॅड सागर सुर्य़वंशी, अ‍ॅड. शितल तेजवानी आणि अ‍ॅड. प्रियंका शेलार यांनी कोणत्याही नागरिकांची मिळकती संदर्भात फसवणुक केली असेल तर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आप्पासाहेब वाघमळे यांनी केले आहे.