ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाराणसीतील गीतरामायणात रंगले

मुंबई : वृत्तसंस्था – राज्यातील विविध शहरात दररोजचा दौरा, उद्घाटने, भूमीपूजन त्यात व्यस्त असलेले आणि मंत्रालयातील बैठकांमध्ये मग्न असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गुरुवारी थोडी उसंत मिळाली तीही चक्क उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये. निमित्त होते गीत रामायणाचे. वाराणसीतील या गीत रामायणात मुख्यमंत्री रंगून गेले होते.

गेले तीन दिवस मुंबईत बेस्टचा संप सुरू आहे. गुरुवारी दुपारी वाराणसीला जाण्यापूर्वी त्यांनी बेस्ट संपाबाबत बेस्टच्या महाव्यवस्थापकांशी सविस्तर चर्चा केली. गुरुवारी सायंकाळी कविश्रेष्ठ स्व. ग. दि. माडगूळकर व गायक स्व. सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘गीत रामायण’ कार्यक्रमाचे आयोजन वाराणसी येथील सरोजा पॅलेस येथे करण्यात आले होते. यावेळी येथील मराठी भाषिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी येथील काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदार संघातील या मंदिर परिसराचा कसा विकास होणार आहे, याची माहिती यावेळी मंदिराचे विशेष कार्यकारी अधिकारी विशाल सिंह यांनी फडणवीस यांना दिली. यावेळी राज्यमंत्री अमरजीत मिश्रा व उत्तरप्रदेशचे राज्यमंत्री डॉ. नीलकंठ तिवारी आणि इतर उपस्थित होते.

त्यानंतर त्यांनी बोटीतून गंगा नदीत विहार करुन गंगामातेला वंदन केले. त्यानंतर रात्री ११ वाजता ते वाराणसीहून दिल्लीला रवाना झाले. शुक्रवारी दिल्लीत समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या