2 लाखाची लाच घेताना मुख्याधिकार्‍यासह फायरमन अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका ठेकेदाराकडून 2 लाख रूपयाची लाच घेणारा मुख्याधिकारी आणि फायरमन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन) जाळयात अडकले आहेत. अ‍ॅन्टी करप्शनने ही कारवाई बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास केली आहे. दोन लाखाची लाच स्विकारताना मुख्याधिकार्‍यास अटक झाल्याने संपुर्ण जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मुख्याधिकारी नानाभाऊ विश्‍वनाथ महानवर आणि त्यांनी ज्याच्या करवी लाच घेतली तो मुकूंद रामराव मुसमाडे (सहाय्यक फायरमन) सध्या अ‍ॅन्टी करप्शनच्या ताब्यात आहेत. त्यांनी एका ठेकेदाराकडे त्याच्या कामास मंजुरी देतो असे सांगुन 2 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. ठेकेदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. प्राप्‍त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. मुख्याधिकारी नानाभाऊ विश्‍वनाथ महानवर आणि सहाय्यक फायरमन मुकंद मुसमाडे हे 2 लाखाची लाच मागत असल्याचे पडताळणीत निष्पन्‍न झाल्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा येथे सापळा रचला. सरकारी पंचासमक्ष मुख्याधिकारी नानाभाऊ विश्‍वनाथ महानवर यांनी फायरमन करवी 2 लाखाची लाच स्विकारली. त्यानंतर अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने मुख्याधिकारी नानाभाऊ विश्‍वनाथ महानवर आणि फायरमनला ताब्यात घेतले आहे.

गेल्या दोन-चार दिवसांमध्ये अ‍ॅन्टी करप्शन विभागाने मोठ-मोठया अधिकार्‍यांना लाच घेताना अटक केली आहे. आज (बुधवारी) मुख्याधिकारी नानाभाऊ विश्‍वनाथ महानवर देखील अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात सापडल्याने शासकीय वर्तुळात देखील चर्चा होत आहे. यापुर्वी बीड अ‍ॅन्टी करप्शनने बीडच्या अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे आणि त्यांच्या एका सहकार्‍याला 5 लाखाची लाच घेताना अटक केली होती. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. बुलढाणा जिल्हयातील शेगाव येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पंत यांना देखील 1.20 लाखाची लाच घेताना त्यांच्या सहकार्‍यासह अटक करण्यात आली होती. या दोन्ही कारवयांना दोन-चार दिवस देखील झाले नाहीत तोच देवळाली प्रवरा येथील मुख्याधिकारी नानाभाऊ विश्‍वनाथ महानवर यांना त्यांच्या सहकार्‍यासह 2 लाखाची लाच घेताना अटक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलिस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक किशोर चौधरी, निरीक्षक शाम पवरे, दिपक करांडे, कर्मचारी तनवीर शेख, प्रशांत जाधव, रमेश चौधरी, विजय गंगुल, महिला कर्मचारी राधा खेमनर, चालक अशोक रक्‍ताटे यांच्या पथकाने केली.