Pulwama attack : चीन अजूनही पाकिस्तानच्या बाजूने, मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास नकार

वृत्तसंस्था : पुलवामा जिल्ह्यात काल (दि-१४) दहशतवादी हल्ला झाला. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर चीनने या घटनेचा निषेध केला आहे. परंतु तरी देखील चीने पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिल्याचे दिसत आहे. जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्राकडे मागणी केली होती. परंतु चीनने या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला आहे. भारताची ही खूप जुनी मागणी आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर चीनच्या भूमिकेत बदल होईल अशी अपेक्षा होती. मात्र चीनने आपल्या भूमिकेत बदल करण्यास नकार दिला आहे.

काल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. हा हल्ला दहशतवादी आदिल अहमद डारने घडवून आणला होता. स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल ३५० किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज २ ते ३ किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झाले तर अनेकजण गंभीर जखमी झाले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे.

दरम्यान पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला होता. शिवाय सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला. स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली आणि मोठा स्फोट झाला. जवानांच्या ताफ्यावर गोळीबारही झाला. त्यात ७६ व्या बटालियनच्या वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. अन्य काही वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. परिसरात काही अतिरेकी लपून बसले असावेत आणि त्यांनी हा गोळीबार केला असावा, असा तर्क आहे. हल्ला झालेले ठिकाण श्रीनगरहून ३० कि.मी.वर आहे. सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. दर खेपेस हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती असेही समजत आहे.