बेपत्ता बालकाचा खून, शरिराचे तुकडे करुन फेकले जंगलात

चोपडा (जळगाव) : पोलीसनामा ऑनलाईन – चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील १४ वर्षीय बेपत्ता मुलाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. बेपत्ता मुलाचा खून करुन त्याच्या शरिराचे तुकडे बाभूळ वनात फेकून देण्यात आले. ही घटना आज (मंगळवार) उघडकीस आली असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

मंगेश दगडू पाटील (वय-१४ रा. शिवाजीनगर, चहार्डी) हा इयत्ता आठवीमध्ये शिकत होता. २ फेब्रुवारी रोजी तो शाळेतून घरी आला. शौचास जाऊन येतो असे सांगून तो घरा बाहेर पडला. मात्र, तो घरी आलाच नाही. त्याचे वडील दगडू पाटील यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली होती. पोलीस मंगेशचा शोध घेत असतानाच आज त्याचा एक पाय शिवाजीनगर जवळील बाभूळ वनात सापडला.

मंगेश या बालकाचा एक पाय कुत्र्याने शिवाजीनगर लगत असलेल्या खळवाडीत ओढून आणल्याने या घटनेचा उलगडा झाला. घटनास्थळी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी मनोज पवार, सहायक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर, अर्चना कुरपुळे, पोहेका सुनील पाटील, राजू महाजन, संतोष पारधी, सुनील कोळी, नीलेश सोनवणे, प्रदीप राजपूत हे घटनास्थळी दाखल झाले. ते मुलाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत असून मृतदेह शोधण्यासाठी जळगाव येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते.