‘सीआयडी’ने केला विधिमंडळाचा अवमान ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – थेट विधिमंडळात प्रश्न उपस्थित झालेल्या पाथर्डी येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यावरील गुन्ह्याचा तपास वर्षभरापासून रखडला आहे. या गुन्ह्यात महत्वाचा पुरावा ठरणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या आवाजाचा नमुना अद्यापपर्यंत ‘सीआयडी’ने घेतलेला नसल्याचे समोर आले आहे. तपासाला गती मिळावी, यासाठी गृहराज्यमंत्र्यांनी या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे दिला होता. प्रत्यक्षात मात्र तपासात काहीच प्रगती नसल्याने हा विधीमंडळाचा अवमान आहे, असा आरोप या गुन्ह्याशी संबंधित असलेल्यांनी केलेला आहे. त्यामुळे मुंडे यांनी हा प्रश्न पुन्हा विधिमंडळात उपस्थित करण्याचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा – पुण्यात पद्मावती परिसरात तरुणाचा खुन 

पाथर्डी येथील पत्रकार हरिहर गर्जे व सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पत्रकार संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेवून गर्जे यांच्यावर व्यक्ती द्वेषातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निवेदन दिले होते. त्यावर पोलीस अधीक्षकांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्याविरोधात ११ जानेवारी रोजी असाच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये किसन आव्हाड व विजय आव्हाड यांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या होत्या.
‘त्या’ क्लिपनंतर प्रकरणाला वेगळे वळण

पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व विजय आव्हाड यांच्यात मोबाईल फोन वरून झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप १४ फेब्रुवारी २०१८ रोजी सोशल मेडीयावर व्हायरल झाली होती. या क्लिपमधील संवादातून कशा पध्दतीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला, याचे संभाषण आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर खोट्या गुन्ह्यात पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना अडकविले जात असल्याने जिल्हाभरातून सामाजिक संघटनानी आंदोलने केली होती. याप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गर्जे व आव्हाड यांच्यावरील गुन्हे व व्हायरल क्लिपबाबत सीआयडी कडे तपास देण्याचे तसेच खोट गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग झाले. गुन्हा वर्ग होवून एक वर्ष उलटून गेले असताना या गुन्ह्याच्या तपासात मात्र काहीच प्रगती होत नाही.
केवळ वेळकाढूपणा

पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी व इतर गुन्ह्याचा तपासाच्या अनुषंगाने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याचे समोर आले आहे. तपासात कुठल्याही प्रकारची प्रगती जाणवत नाही. त्यामुळे तपास यंत्रणेच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.