व्यावसायिक ओसवाल यांच्या खुनाचा एलसीबीकडून छडा

पुणे : पोलिसानामा ऑनलाईन- शहरातील वाडा विकसित करणाऱ्या रिकबचंद ओसवाल या व्यावसायिकाचा खून करून मृतदेह मौजे शिळीम गावाच्या हद्दीत फेकून देण्यात आला होता. या खुनाचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ४० लाख रुपयांची मागणी पुर्ण न केल्याने व्यावसायिकाचा दोघांनी खून करू मृतदेह दोन दिवस गुप्त ठिकाणी ठेवून त्याची विल्हेवाट लावली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.महेंद्र शांताराम बोडके (धनकवडी) व अजय प्रदिप बारमुख (इंदिरानगर भोसरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिक रिकबचंद रायचंद ओसवाल (७०, महात्मा फुले पेठ) हे स्वारगेट परिसरातून बेपत्ता झाल्याबाबत खडक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. दहा जानेवारीपासून ते बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह तेरा जानेवारी रोजी भोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे शिळीम गावाच्या परिसरातील नाणे दांड शिवारात तुकाराम डेरे यांच्या शिवारात आढळून आला होता. त्यांचे दोन्ही हात छातीजवळ दोरीने बांधून व तोंड पांढऱ्या रुमालाने बांधून फेकून देण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी भोर पोलिस ठाण्यात पोलिस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानतंर पोलिस अधिक्षक संदिप पाटील अप्पर पोलिस अधिक्षक संदिप पखाले व भोर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना समांतर तपास करून गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिस निरीक्षक घनवट यांनी पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या अधिपत्याखाली स्वतंत्र तपास पथक नेमले होते. त्यानंतर त्यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली. त्यावेळी महेंद्र शांताराम बोडके व अजय प्रदिप बारमुख या दोघांनी ओसवाल यांचा खून केल्याचा सुगावा लागला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर दोघांनी ओसवाल यांनी पैशांची मागणी केली होती. ती रक्कम ते देत नसल्याने त्यांचा खून करून दोन दिवस मृतदेह गुप्त ठिकाणी ठेवून बारा जानेवारी रोजी विल्हेवाट लावण्याकरता  तो मौजे शिळीम गावाच्या परिसरात झाडा झुडपांमध्ये फेकून दिला. असे कबूल केले.

चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनतर पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक पोलिस फौजदार दिलीप जाधवर, पोलिस हवालदार दयानंद लिमण, चंद्रकांत झेडे, जगदिश शिरसाठ, राजू चंदनशिव, शंकर जम, मोरेश्वर इनामदार, मुकुंद आयाचित, पोलिस नाईक सचिन गायकवाड, विशाल साळुंखे, पोलिस कॉन्सटेबल बाळासाहेब खडके, अक्षय नवले यांच्या पथकाने खुनाचा छडा लावला.