‘डाव्यांच्या मनात एवढा द्वेश असेल असे वाटले नव्हते’

कोलम (केरळ) – वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमला प्रकरणी आपली भूमिका मांडताना, केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारने महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत घेतलेल्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. शबरीमाला प्रकरणी, ‘भारतीय जनता पक्ष संस्कृतीसोबत आहे’ असे सांगत ‘याप्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका इतिहासात सर्वात लाजिरवाणी होती’ अशी टीका केली आहे. याशिवाय, ‘डाव्यांच्या मनात एवढा द्वेश असेल असे वाटले नव्हते’ असेही ते म्हणाले. केरळमधील कोलम येथे प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, ”संपूर्ण देश गेल्या काही काळापासून शबरीमला मंदिराची चर्चा करत आहे. शबरीमला प्रकरण हाताळताना केरळमधील सत्ताधारी एलडीएफ सरकारने केलेले इतिहासात सर्वात लाजिरवाणे म्हणून ओळखले जाईल. डावी मंडळी भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकता यांचा सन्मान करत नाही हे आम्हाला माहीत होते. मात्र याविषयी त्यांच्या मनात एवढा द्वेश असेल असे वाटले नव्हते.”

यावेळी मोदींनी शबरीमला प्रकरणात आपल्या पक्षाचीही भूमिका स्पष्ट केली. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ”केरळ आणि केरळमधील संस्कृतीच्या रक्षणासाठी जर कुठला पक्ष उभा असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. शबरीमला प्रकरणी आमच्या पक्षाची भूमिक नेहमीच स्पष्ट राहिली आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडी हीसुद्धा एलडीएफपेक्षा वेगळी नाही. काँग्रेसवाले शबरीमला प्रकरणी राज्यामध्ये वेगळे बोलतात. तर संसदेत काही वेगळेच बोलतात. मात्र आता त्यांची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे.”

इतकेच नाही तर, यूडीएफ आणि एलडीएफ यांच्यावरही मोदींनी टीकेचे ताशेरे आेढले आहेत. यूडीएफ आणि एलडीएफ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीका मोदींनी केली. याशिवाय, ‘दोन्ही आघाड्यांची नावे वेगळी असली तरी भ्रष्टाचार, जातीवाद आणि सांप्रदायिकतेबाबत त्यांची भूमिका एकच आहे’ असेही मोदींनी सांगितले.