श्रीगोंद्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे दबावतंत्र !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी आज श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणात दबावतंत्राचा वापर करीत सहकारमहर्षी  नागवडे कारखान्याच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा राजीनामा कारखान्याचे अध्यक्ष व काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

शेलार हे विखे गटाचे मानले जातात. नुकत्याच झालेल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी पाचपुते यांच्या गडाला खिंडार पाडत काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. श्रीगोंदा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडे खेचून आणले होते. या विजयाचा गुलाल पुसण्याअगोदरच पक्षातील श्रीगोंदा तालुक्यातील दुसरे नेते राजेंद्र नागवडे यांच्यासोबतचा अंतर्गत कलह सुरू झाला. नागवडे हे थोरात गटाचे मानले जातात. नागवडे यांच्यावर दबाव टाकण्यासाठी शेलार यांनी आज नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा राजीनामा नागवडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

शेलार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त पसरताच श्रीगोंदा नव्हे, तर नगर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राजेंद्र नागवडे व अण्णासाहेब शेलार या श्रीगोंदा तालुक्यातील दोन मातब्बर नेत्यांमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. शेलार यांच्याकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद असतानाही तालुका काँग्रेस अंतर्गत राजकारणात आपल्याला विश्वासात घेत नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले जाते. त्यातूनच त्यांनी नागवडे यांच्यावर दबावतंत्राचा वापर करण्यासाठी राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे. त्यांचा राजीनामास्त्रने नागवडे गटाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.