हे एकदा ऐकाच मोदीजी, काँग्रेस ने ७० वर्षात ही कामे केली

दिल्ली : वृत्तसंस्था – २०१४ पासून भाजप पक्ष देशात सत्तेत आला आहे, त्यानंतर भाजप चे मंत्री, स्वतः नरेंद्र मोदी काँग्रेसनं 70 वर्षांमध्ये काय केलं, असा प्रश्न विचारतात. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांपासून सव्वासो करोड देशवासीयांना मोदी हा प्रश्न विचारत आहेत. त्यांच्या या प्रश्नाला काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला सत्तेत येऊन पावणे पाच वर्ष झाली. तरीही काँग्रेसनं 70 वर्ष काय केलं, हाच प्रश्न तुम्ही विचारता, असं म्हणत आझाद यांनी स्वातंत्र्यापासून काँग्रेसनं केलेल्या कामांची यादीच दिली.
काँग्रेसनं आतापर्यंत काय काय केलं, हे एकदा ऐकाच मोदीजी. तुम्ही ज्या देशाचे पंतप्रधान आहेत, ज्याला आपण भारत म्हणतो, त्या देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचं योगदान मोठं आहे. गांधीजींच्या नेतृत्त्वाखाली आम्ही इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरु देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा देश अनेक तुकड्यांमध्ये विभागलेला होता. त्याला काँग्रेसनं एकसंध रुप दिलं. तुम्ही आज एका तुकड्याचे पंतप्रधान नाहीत. याचं श्रेय काँग्रेसला जातं, असं प्रत्युत्तर आझाद यांनी दिलं.

आम्ही एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राला निर्माण केलं. या देशाला एक अशी घटना दिली, की त्यामुळे सर्वांना स्वातंत्र्य आणि समानता मिळालं. दलित, शोषित आणि शेतकऱ्यांसाठी फार काम झालं नाही, असं मोदी म्हणतात. मी त्यांना सांगू इच्छितो, गांधीजींनी स्वातंत्र्य मिळण्याआधीच दलितांच्या हक्कासाठी संघर्ष सुरू केला होता. आम्ही घटनेची अंमलबजावणी सुरू करताच दलितांना आरक्षण दिलं. त्यांना शिष्यवृत्ती दिली. त्यांच्या प्रगतीसाठी कायदे केले. अस्पृश्यतेविरोधीत कायद्याची निर्मिती केली. यानंतरही तुम्ही आम्हालाच विचारता काय केलं? आम्ही घटनेच्या आधारे देश चालवला. धर्माच्या नावानं देश चालवला नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा उल्लेख आझाद यांनी भाजपावर हल्ला चढवला.

राहुल गांधींच्या सूचनेवरुन आम्ही जमीन अधीग्रहण कायदा केला.आश्वासनं द्यायची आणि मग ती सोयीस्करपणे विसरुन जायची, असं भाजपासारखं राजकारण आम्ही करत नाही. काळ्या पैशाचं काय झालं? रोजगार संधींचं काय झालं? शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणार होतात. त्याचं काय झालं? आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. सत्तेवर येताच अवघ्या काही तासांमध्ये आश्वासनांची पूर्तता केली. सध्या आम्ही जाहीरनाम्यावर काम करत आहोत. लवकर तो जनतेसमोर आणू, असं आझाद यांनी पत्रकारांना सांगितलं.