काँग्रेस, राष्ट्रवादीची दिल्लीत बैठक सुरू, जागावाटप अंतिम टप्प्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महत्वाची बैठक सुरू आहे. महाराष्ट्रातील आघाडीच्या जागा वाटपाबाबत ही बैठक असल्याचे समजत आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे उपस्थित आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटप हे अंतिम टप्प्यात आले आहे मात्र तरीही काही जागांवर अद्याप तोडगा निघालेला नाही असे समजत आहे. आता सुरू असलेल्या बैठकीत यावर चर्चा सुरु आहे. यावरही तोडगा निघेल असे दिसत आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अनुकूल वातावरण असल्याचं पाहणी अहवालात समोर आलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा आपल्याच वाट्याला याव्यात यासाठी दोन्हीही पक्षांची धडपड असल्याचे दिसत आहे. दरम्यान राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहे. लोकसभेच्या जास्त जागा असणार्‍या काही मोजक्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.

गेल्यावेळी काँग्रेसने २६ जागा लढवल्या होत्या. परंतु यापैकी केवळ दोनच जागा काँग्रेसला जिंकता आल्या होत्या. तर राष्ट्रवादीने एकूण २१ जागा लढवल्या होत्या त्यापैकी चारच जागा राष्ट्रवादीला जिंकता आल्या होत्या.