लोकसभेचं समरांगण : पारंपरिक मतदारसंघ खेचून आणण्यासाठी काँग्रेस सज्ज

पुणे : पोलीसनामा ऑनसाईन-(मल्हार जयकर) – पुणे शहर लोकसभा मतदार संघ हा तसा पारंपरिकरित्या काँग्रेसचाच! स्वातंत्र्योत्तर काळात इथं सतत काँग्रेसचाच खासदार निवडून येत असे. फक्त एकदाच समाजवादी काँग्रेसच्या छुप्या पाठींब्यानं भाजपचे अण्णा जोशी निवडून आले होते. त्यानंतर जनता पक्षाची लाट, आणि नरेंद्र मोदींची लाट या काळातच विरोधीपक्षाचे खासदार निवडून आले. कोणतीही लाट नसेल आणि सरळ जरी लढत झाली तर काँग्रेसचाच खासदार निवडून येतो.हे सिद्ध झालंय. सुरेश कलमाडी यांच्यानंतर काँग्रेसला सक्षम नेतृत्वच लाभलेलं नाही. राहुल गांधींची आक्रमकता, प्रियांका वाद्रा यांचं पक्षांत झालेलं आगमन यामुळं कार्यकर्त्यांत उत्साह संचारलाय. आणि इच्छुकांनीही मोर्चेबांधणी सुरू केलीय. यात प्रामुख्यानं अभय छाजेड, मोहन जोशी, अरविंद शिंदे यांची नावं घेतली जाताहेत. दरम्यान भाजपचे राज्यसभेतले सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी थेट राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसच्या वतीनं लोकसभा लढविण्याचा चालविलेला प्रयत्न, यामुळं सध्या तरी या चौघांची नावं चर्चेत आहेत.

काँग्रेसनं उभारीच घेतली नाही
काँग्रेसपक्षावर प्रारंभीच्या काळात बाबुराव सणस यांचं वर्चस्व होतं. त्यानंतर पक्षाची आणि महापालिका राजकारणाची सूत्रं ही शिवाजीराव ढेरे यांच्याकडं आली त्यांच्यानंतर बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांच्याकडे ती आली. त्यांनी प्रकाश ढेरे यांना नेमून आपलं राजकारण शहरांत केलं. त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं सुरेश कलमाडी यांनी उचल खाल्ली आणि पक्षाचा ताबा घेतला. त्यांनी त्यावर जबरदस्त वर्चस्व गाजवलं. कॉमनवेल्थ प्रकरणी भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर त्यांना पक्षातून निलंबित केलं गेलं. त्यानंतर शहरातला काँग्रेस पक्ष विस्कळीत झाला, नेतृत्वहीन बनला. तो आजतागायत सुस्थिर झालेला नाही. गटबाजींनी पोखरलेली काँग्रेस असंच त्याचं स्वरूप राहिलं आहे. सध्याचे शहराध्यक्ष हे कलमाडी यांचे खंदे समर्थक असले तरी ते गतवैभव पक्षाला अद्याप मिळालेलं नाही.

अभय छाजेड…
कलमाडी यांच्या कार्यकाळात आणि त्यानंतरही अभय छाजेड हे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. जवळपास चारवेळा ते महापालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. प्रदीर्घ काळ नगरसेवक आणि शहराध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी छाजेड यांनी पार पडली असल्यानं त्यांना शहरातल्या कार्यकर्त्यांची चांगलीच माहिती आहे. प्रश्नाचीही चांगली जाण आहे. त्यांनी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे पण त्यांना अर्थसंकल्प सादर करण्याची संधीच मिळाली नाही, पण सक्षम नसलेल्या तीन काँग्रेसी स्थायी समिती अध्यक्षांचे अर्थसंकल्प त्यांनी तयार केले होते.२०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पर्वती मतदारसंघात दारुण पराभव झाला. त्यांची अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढविली होती. आता त्यांनी लोकसभेसाठी कंबर कसली आहे

मोहन जोशी…
काँग्रेसकडून चर्चेत असलेली जी नांव आहेत. त्यात मोहन जोशी हे एक वजनदार नाव आहे. युवक काँग्रेसचा साधा कार्यकर्ता ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचा प्रांताध्यक्ष अशी त्यांची गाजलेली कारकीर्द आहे. जनता पक्षाच्या राजवटीत प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या मोटारीसमोर रस्त्यावर आडवं पडून केलेलं आंदोलन, याच काळात समाजवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेलं काँग्रेस भवन महिलाध्यक्षा ऍड. शालिनी राणे यांच्या मदतीने घुसखोरी करून त्यांचा ताबा इंदिरा काँग्रेससाठी घेतला त्यामुळं काँग्रेस भवन हे काँग्रेसकडं राहीलं. अशी अनेक आंदोलनं जोशींनी केली आहेत. सतत कार्यकर्त्यांत वावरणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. शिवाय दिल्लीतील अनेक वरिष्ठांशी त्यांचे संबंध आहेत. जनता पक्षाच्या काळात मोहन जोशींनी विठ्ठल तुपे यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढत दिलेली आहे. ही त्यांची जमेची बाजू आहे.

अरविंद शिंदे…..
गेली तीन टर्म महापालिकेचे ते नगरसेवक आहेत. सध्या महापालिकेत काँग्रेसचे पक्षनेते म्हणून आपली भूमिका बजावत आहेत. ते पहिल्यांदा महापालिका निवडणुकीसाठी उभे राहिले ते उपमहापौर असलेल्या अली सोमजी यांना डावलून मिळवलेल्या उमेदवारीनं! त्यांच्यावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा वरदहस्त आहे. काँग्रेसची बाजू प्रभावीपणे मांडणारा नेता म्हणून प्रसिद्धीमाध्यमामध्ये ओळखले जातात. गेल्यावर्षी महाराष्ट्रातून निवडून द्यावयाच्या राज्यसभा सदस्यांसाठी त्यांचं नाव चर्चिलं गेलं होतं. पण त्यांच्याऐवजी माजी केंद्रीय अर्थमंत्री चिदंबरम यांना उमेदवारी दिली गेली. या साऱ्या पार्श्वभूमीवर त्यांनी लोकसभा उमेदवारीवर आपला हक्क सांगितलाय.

पाहू या आगामी काळात काय होतंय ते
शहर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-भाजप अशी सरळ लढत होईल. गेली अनेक वर्षे भाजपची शहरात अडीच लाख मतं ही त्यांच्या हक्काची होती. मोदी लाटेत त्यात दुपटीने वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळं इथं भाजपची उमेदवारी ज्याला मिळेल तो निवडून येण्याची शक्यता असल्यानं भाजपत इच्छुकांची संख्या मोठी आहे. पण पुण्याची खासदारकी खेचून आणून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करू अशी काँग्रेसी उमेदवारांची जिद्द आहे. पाहू या कुणाला उमेदवारी मिळतेय अन कशी लढत होतेय !