लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ठेवलेल्या शरीर संबंधाला बलात्कार ठरवता येणार नाही – सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या लोकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सम्मतीने ठेवलेले शरीर संबंध बलात्कार होऊ शकत नाही असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना व्यक्त केले आहे. महाराष्ट्रतील एका वैद्यकीय परिचारिकेने डॉक्टरविरोधात दाखल केलेल्या खटल्यात हे स्पष्टीकरण न्यायालयाच्या वतीने देऊन डॉक्टरविरोधात दाखल केलेली याचिका हि न्यायालयाने निकाली काढली आहे.

महाराष्ट्रातील एका महिलेने तिच्या सोबत रिलेशनमध्ये असणाऱ्या डॉक्टर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पती मरण पावल्यानंतर सदरची महिला डॉक्टरकडे परिचारिका म्हणून कामाला लागली. डॉक्टरा सोबत तिचे प्रेम संबंध सुरु झाले. त्यानंतर प्रेम संबंध असल्याने या दोघांनी लिव्ह इन रिलेशनमध्ये राहायला सुरुवात केली. काही काळाने त्यांच्यात कलह निर्माण झाल्या नंतर या महिलेने डॉक्टरच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या विरोधात डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. त्यात त्यांचा विजय झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. ए के सिकरी आणि एस अब्दुल नाझीर या न्यायमूर्तींच्या न्यायपीठाने दिलेल्या निर्णयात म्हणले आहे कि, बलात्कार आणि संमतीने ठेवलेल्या शरीर संबंधात फरक असतो. अशा गुंतागुंतीच्या प्रकरणात सखोल चौकशीची आवश्यकता असते. आरोपीचा पीडित महिलेशी शरीर संबंध ठेवण्याचा नेमका उद्देश काय होता. शरीर संबंध ठेवण्यामध्ये वासना होती का, वासना क्षमवण्यासाठी लग्नाचे खोटे अमिश दाखवले होते का ? या सर्व बाबी फसवणुकीच्या अंतर्गत येतात. त्या बलात्कार होऊ शकत नाहीत. सदरच्या प्रकरणात महिलेच्या संमतीने शरीर संबंध ठेवले गेल्याने या प्रकरणाला बलात्कार ठरवता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हणले आहे. न्यायालयाने आज दिलेल्या निकालाचे सर्वत्र स्वागत केले जाते आहे. लोकांची  मानहानी करण्यासाठी हि बलात्काराच्या कायद्याचा अस्त्रासारखा वापर करण्याची विकृती समाजात वाढत चालली आहे. त्या विकृतीला आजच्या न्यायालयाच्या निकालाने चांगलीच चपराक दिली आहे.