राज्य सरकारच्या ‘त्या’ पुरस्कारावर घेतला जातोय आक्षेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कार’च्या निवडीवर आता तमाशा कलाकारांनीच आक्षेप घेतल्याने मोठा पेच राज्याच्या सांस्कृतिक विभागासमोर पडला आहे. या वर्षीचा ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कार’ बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर करण्यात आला आहे. परंतु तमाशा कलाकारांनी त्यांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे.

कवठेकर यांनी तमाशासाठी फक्त लिखाण केले मात्र त्यांनी तमाशासाठी काहीच केले नाही म्हणून ते या पुरस्कारासाठी अपात्र आहेत असे तमाशा कलाकारांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणले आहे. त्याच प्रमाणे पुरस्काराची निवड समिती बरखास्त करा अशी देखील मागणी तमाशा कलाकारांनी केली आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे सन २००५ पासून तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार विविध कलाकारांना प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने दिला जातो. त्या तमाशा कलाकार होत्या त्याच प्रमाणे त्या राष्ट्रपती सांस्कृतिक पदक विजेत्याही होत्या. विठाबाईंनी १९६५, १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात सैन्याचे मनोरंजन करण्यासाठी युद्धभूमीजवळ जाऊन आपली तमाशाची कला सादर केली होती. याच सर्व कार्याचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावे तमाशा कलाकारांना जीवन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. ५ लाख रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असते.

१५ फेब्रुवारीला पुण्याजवळील वाघोली येथे बाजार मैदानात या पुरस्काराच्या वितरण करण्यात येणार असून या निमित्त १४ फेब्रुवारी ते १८ फेबुवारी तमाशा मोहत्सवाचे आयोजन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मंगला बनसोडे, कांता सातारकर, मालती इनामदार आणि रघुवीर खेडकर या बड्या तमाशा कलाकारांचे तमाशा फड आपली कला सादर करणार आहेत.