नगरसेवकाची दादागिरी, उधारीचे पैसे मागितल्याने मेडिकलच जाळले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर मधील कोपरगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. उधारीने घेतलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या कारणाने नगरसेवकाने चक्क मेडिकलच जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोपरागाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे. संदीप पगारे असे या नगरसेवकाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील टाकळी मार्गावरील साईआश मेडिकल आणि जनरल स्टोअर्स येथे नगरसेवक संदीप पगारे आणि त्यांच्यासोबत आणखी दोघे जण आले होते. त्यावेळी, यापूर्वी उधारीवर घेतलेल्या पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले असता मेडीकल चालक सचिन निबा शिरोडे यांना धक्काबुक्की केली. एवढेच नाही तर मेडिकल बळजबरीने काऊंटरचा दरवाजा तोडला. त्याने मेडिकल चालकाला दुकान जाळून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात येत आहे. यानंतर मेडिकल दुकानास आग लावली. या आगीत संपूर्ण मेडिकल दुकानातील सामग्री भस्मसात झाली. हा सर्व प्रकार रात्री ९ ते १० च्या दरम्यान घडला.

या प्रकरणी पोलिसांनी संदीप पगारेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.