अनुपम खेर यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

मुझफ्फरपूर : वृत्तसंस्था – ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातील मुख्य कलाकार अनुपम खेर यांच्या सह १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिहार न्यायालयाने दिले आहेत. या चित्रपटातून काही मोठ्या लोकांची बदनामी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात ही तक्रार दाखल केली आहे.

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाला सुरुवात झाली आहे. याव्यतिरिक्त काँग्रेसनेही या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटातून गांधी कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला जात आहे.

सुधीर ओझा यांनी आपल्या याचिकेत, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांचे मीडिया सल्लागार संजय बारु यांच्या भूमिका अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांनी साकारली आहे. या दोघांनी सिंग आणि बारू यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. यामुळे माझ्यासह अनेकांच्या भावना दुखावल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका वड्रा यांच्याही प्रतिमेला धक्का पोहचवला आहे.

दरम्यान, ओझा यांच्या तक्रारीनंतर आज मंगळवारी मुझफ्फरपूर कोर्टात न्यायाधीशांनी अनुपम खेर यांच्यासह अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.