कुख्यात गणेश मारणेसह 10 जण गुन्हे शाखेच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संदीप मोहोळ खून प्रकरणातील आरोपी गणेश मारणे आणि त्याच्या टोळीतील 10 जणांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेरून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

संदीप मोहोळ खून प्रकरणाचा खटला शिवाजीनगर न्यायालयात चालु आहे. खून प्रकरणातील आरोपी गणेश मारणे, अनिल खिलारे, इंद्रनील मिश्रा, रहिम शेख, संतोष लांडे, शरद विटकर, संजय कानगुडे, विजय कानगुडे, निलेश माझिरे आणि दत्‍ता काळभोर हे तारखेसाठी शिवाजीनगर न्यायालयात गेले होते. दरम्यान, सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे यांची शिवाजीनगर न्यायालयात साक्ष होती. मारणे आणि त्याच्या टोळीतील इतर 9 जण न्यायालयाच्या बाहेर उभे होते.

मारणे आणि त्याच्या टोळीकडे पोलिसांचा चौकशी करावयाची असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्‍त प्रदीप देशपांडे, उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे, गुंडा स्कॉडचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक दिपक लगड, पथकातील सुनिल पवार, संभाजी गायकवाड, शंकर संपत्‍ते, विशाल शिर्के आणि सागर घोरपडे यांनी मारणे आणि त्याच्या टोळीतील इतरांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेत त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. ताब्यात घेण्यात आलेले सर्वजण संदीप मोहोळ खून प्रकरणातील आरोपी असून त्यांच्यावर इतर गुन्हे देखील दाखल आहेत.