पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकांना फसवणारा सराईत गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस असल्याची बतावणी करुन ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली. गुन्हेगाराकडून ज्येष्ठ नागरिकाकडून लुटलेला १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शिवाजीनगर येथे सापळा रचून करण्यात आली.

हैदर शफ्फानअली ईरानी (वय-२१ रा. ईरानी वस्ती, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भानुदास गुलाब जाधव (वय-६५ रा. लोहियानगर, पुणे) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी जाधव हे ४ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास लोहियानगर येथील सर्वजनीक रस्त्यावरुन जात होते.

त्यावेळी आरोपीने त्यांच्याजवळ येऊन पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच या परिसरात तुमच्या सारखे काही इसम पावडर विकत असल्याची माहिती मिळाली असल्याचे सांगून त्यांचे खिसे तपासले. खिसे तपासत असताना आरोपीने खिशातील दोन हजार रुपये आणि ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरुन नेली. जाधव यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरु केला. या गुन्ह्यातील आरोपी शिवाजीनगर येथे असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शिवाजीनगर येथे सापळा रचून आरोपीला अटक केली. तसेच गुन्ह्यात चोरलेली अंगठी आणि दोन हजार रुपये असा एकूण १४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

ही कारवाई परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, फरासखाना विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस उप निरीक्षक विक्रम मिसाळ, पोलीस हवालदार अंकुश मिसाळ, पोलीस शिपाई दिनेश खरात, राहूल धोत्रे, विशाल जाधव, समीर माळवदकर, बंटी कांबळे, तेजस पांडे, विकास वाघमारे यांच्या पथकाने केली.