गंभीर गुन्हे असणाऱ्या तांदळे टोळीतील दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या आणि भाड्याने वाहने घेऊन लूटमार करणाऱ्या टोळीतील दोघांना चाकण पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली आहे. यातील मुख्य खेडचे ‘जेल’ तोडून फरार झालेला सराईत गुन्हेगार आहे.
विशाल दत्तात्रय तांदळे (२२, रा. मंचर) आणि गणेश भास्कर वाबळे (१८, रा. भेंडमळा, मंचर) या दोघांना अटक केली आहे तर त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोयत्याचा धाक दाखवून, मारहाण करुन रिंकू प्रजापती यांची बोलेरो गाडी १२ तारखेला चोरुन नेली होती. याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे हलविली. सावरदरी परिसरात एयर लिक्विड चौकात पोलिसांनी पाठलाग करुन तांदळे आणि वाबळे याला ताब्यात घेतले. यावेळी त्यांचे दोन साथीदार पसार झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून बोलेरो आणि स्विफ्ट कार जप्त केली आहे. या टोळीने अश्या प्रकारचे अनेक गुन्हे केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे तांदळे या टोळीचा म्होरक्या असून तो खेडचे जेल तोडून फरार होता. त्याने या काळात नाशिक ग्रामीण, वावी, ओझर पोलीस ठाणे, अमरावती शहरामध्ये राजपेठ पोलीस ठाणे, बीड जिल्ह्यात गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीचे गुन्हे केले आहेत. तांदळे याच्यावर पुणे ग्रामीण, नाशिक ग्रामीण, अमरावती शहर, अहमदनगर, बीड, पुणे रेल्वे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलय येथील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे ३३ गुन्हे दाखल आहेत. तसेच कर्जत पोलीस ठाण्यात खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे.

ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, सुरेश हिंगे, शिवानंद स्वामी, संदीप सोनवणे, संजय जरे, हनुमंत कांबळे, अनिल गोरड, निखिल वर्पे यांच्या पथकाने केली.