पुण्यात खून प्रकरणातील संशयिताच्या घराची जमावाकडून जाळपोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुध व्यावसायिकाचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या आरोपीच्या घराची जमावाकडून जाळपोळ करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली असुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. संशयित आरोपीच्या घराची जाळपोळ झाल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झला होता. मात्र, चतुःश्रृंगी पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेवुन प्रतिबंधात्मक उपाययोजना केली.

दुध व्यावसायिक असलेले रोहित अशोक जूनवणे (28, रा. कस्तुरबा वसाहत, औंध, पुणे) यांचा दि. 1 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला होता. जूनवणे खून प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रतिक सुनिल कदम (19), अमोल महादेव चोरमले (दोघे रा. कस्तुरबा वसाहत, औंध) आणि आकाश आनंदा केदारी (रा. आंबेडकर नगर, औंध) यांना अटक केली होती तर चतुःश्रृंगी पोलिसांनी गजेंद्र उर्फ दादा मोरे याच्यासह इतर पाच जणांना अटक केलेली आहे. जूनवणे याचा खून केल्याचा राग मनात ठेवुन काही जणांनी शनिवारी सकाळी गजेंद्र उर्फ दादा मोरेच्या घराला आग लावली. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरे याच्या घराला कोणी आग लावली याचा तपास पोलिस करीत असल्याची माहिती चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दयानंद डोमे यांनी सांगितले.

जाहिरात