डांगे चौक मोकळा श्वास कधी घेणार ?

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय झाले अन शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारायला पोलिसांनी जोर लावला. हिंजवडी आयटी पार्क, तळवडे, चाकण येथील वाहतूक कोंडी आणि उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाईला जोर आला. चिंचवडहुन हिंजवडीला जायला डांगे चौकातून जावे लागते.

आयटीचे सोमवार ते शुक्रवार हे पाच दिवस वाहतूक कोंडी असतेच मात्र रविवारही आठवडे बाजारामुळे वाहतूक कोंडीतून सामना करावा लागतो. वाकडला वाहतूक विभाग आहे मात्र डांगे चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यात त्यांना अद्याप यश आले नाही. त्यामुळेच डांगे चौक मोकळा श्वास कधी घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, चाकण, तळवडे आदी परिसरात वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. पुणे पोलीस आयुक्तालयातील तसेच पुणे ग्रामीणचे वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष होते. यातच १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय झाले. पोलीस आयुक्त आर.के. पद्नाभन यांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी काम सुरू केले. हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक चक्राकार पद्धतीने केली. यामुळे लाखो आयटीएन्स, व्यापारी आणि गावकरी यांचा वेळ वाचला आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. त्यानंतर चाकण आणि तळवडे आयटी पार्क मधील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. तसेच भूमकर चौकात काहीसे बदल करून तेथील वाहतूक व्यवस्था सुधारली.

शहरात उलट्या दिशेने वाहन चालविणाऱ्या चालकांवर थेट खटले भरण्यास सुरुवात केली. या सर्व बदल्यांमुळे वाहतूक व्यवस्था बराच प्रमाणात सुरळीत झाली. मात्र हिंजवडी आयटी पार्कला जाण्यासाठी असणाऱ्या डांगे चौकातील वाहतूक व्यवस्था अद्याप तशीच आहे.
डांगे चौक हा मोठी बाजारपेठ असणारा चौक आहे. या चौकात दुतर्फा हातगाड्यांचे अतिक्रमण झालेले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होत आहे. तसेच या ठिकावरून हिंजवडी आयटी पार्क, रावेत, काळेवाडी फाटा, चिंचवड स्टेशन या मार्गावर वाहतूक करणारे रिक्षा वाहतूक कोंडीत भर घालत आहेत.

या चौकातून सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसात दररोज हजारो आयटीएन्सची वाहने जात असतात. त्यामुळे नेहमी सायंकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रविवारी रस्त्यावरच आठवडी बाजार भरतो. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. भाजीपाला खरेदीसाठी आलेले आपली वाहने रस्त्यात लावतात त्यामुळे आणखी त्यात भर पडते. यामुळे ५०० मीटरच्या अंतरासाठी तासनतास थांबावे लागते. डांगे चौकापासून पंडित पेट्रोप पंप आणि डांगे चौक ते खासदार बारणे यांच्या घरा पर्यत वाहनाचा रांगा लागलेल्या असतात.डांगे चौकात वाहतूकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक विभागावर दोन तीन कर्मचारी असतात. मात्र ही मनुष्यबळ अपुरे पडते. वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.