राष्ट्रवादीला हवा आहे जागांमध्ये निम्मा वाटा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला आघाडीच्या धर्माकडून ५० टक्के म्हणजे  निम्म्या जागा हव्या आहेत. तर मुंबई मध्ये राष्ट्रवादीला दोन लोकसभेच्या आणि विधानसभेच्या १५ जागा हव्या आहेत. या आघाडीच्या सूत्रावर दोन्ही काँग्रेसमध्ये लवकरच चर्चा होणार आहे. तसेच राष्ट्रवादीच्या या पवित्र्यावर दोन्ही काँग्रेसमध्ये जोरदार घमासान होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे राज्यांत असलेले वजन बघता त्यांना निम्म्या जागा देण्यास काँग्रेस अनुकूलता दाखवेल कारण मताची विभागणी रोखण्यासाठी काँग्रेस कडून हा त्याग केला जाईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजप आणि शिवसेनेला काहीही करून सत्तेपासून दूर ठेवायचे असा निर्धार शरद पवार यांनी केला असून यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाकडून निम्म्या जागा हव्या आहेत. मुंबईतील राष्ट्रवादीचे तिकीट वाटप शरद पवार यांनी सचिन अहिर यांच्यावर सोपवण्यात आले आहे असे बोलले जात आहे. मुंबई शहरातील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे तर उत्तर-पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदार संघात गुरुदास कामत यांच्या निधनाने काँग्रेसला चेहरा उरला नसल्याने हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या गळ्यात घालण्याच्या तयारीत काँग्रेस आहे असे बोलले जाते आहे. उत्तर-पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदार संघही राष्ट्रवादीच्या मनात घर करून बसला आहे कारण या मतदारसंघात दोन्ही पक्षांची आघाडी झाली तर आघाडीचा खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा राष्ट्रवादीचा कयास आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मुंबई मधून १५ मतदारसंघ हवे आहेत असे पक्षाकडून सांगितले जाते आहे. राष्ट्रवादीच्या पसंतीला उतरलेल्या मतदारसंघात  बांद्रा पूर्व, कुर्ला, अनुशक्ती नगर, कांदिवली,दिंडोशी, भांडूप, विक्रोळी, मुलुंड, वरळी, घाटकोपर या मतदार संघाचा समावेश होतो. यापैकी अणुशक्ती विधानसभा मतदार संघातून नवाब मलिक यांचा गत निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला आहे. त्याची सल उतराई करण्यासाठी मलिक चांगलेच कामाला लागले आहेत. तर इतर मतदार संघात राष्ट्रवादीकडे तगडे उमेदवार आहेत असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सचिन अहिर यांनी केला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भांत आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.