अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे -मुंबई महामार्गावरील म्हाळुंगे गावच्या हद्दीमध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (रविवार) आठच्या सुमारास घडला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुणे-मुंबई महामार्गावरील बालेवाडी स्टेडियमजवळ एका अज्ञात वाहनाची धडक हिरो होंडा स्प्लेंडर (एमएच १२ एफक्यू ३४५४) दुचाकीला बसली. या अपघातात दुचाकीवरील एक महिला आणि पुरुष यांचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख अद्याप पटली नाही. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मृत व्यक्तींच्या खिशामध्ये ओळख पटण्यासारखे कोणतीच कागदपत्रे नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

हा अपघात नेमका कसा झाला हे अद्याप समजू शकले नाही. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार एका बसची धडक दुचाकीला बसली. त्यामुळे दुचाकीवरील रस्त्यावर पडल्याने बसचे चाक त्यांच्या अंगावरुन गेले. तर काहींचे म्हणणे आहे कि, एका चारचाकी गाडीने त्यांना उडवले. पाठिमागून आलेल्या बसच्या खाली आल्याने दोघांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.