आंबोलीत दरीत कोसळून भाविकाचा मृत्यू

आंबोली (सिंधुदुर्ग) : पोलीसनामा ऑनलाईन – आंबोली – महादेवगड या पर्यटनाच्या पायथ्याशी असलेल्या सिद्धेश्वर देवस्थानचे दर्शन घेणासाठी जात असताना एका भाविकाचा खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. हा अपघात रविारी (दि.१३) रात्री साठे आठच्या सुमारास घडला. मृत भाविकाचा मृतदेह आज (सोमवार) सकाळी दरीतून बाहेर काढण्यात आला. विश्वास गणू देसाई (वय-४०) असे मृत्यू झालेल्या भाविकाचे नाव आहे.

रविवारी (दि.१३) सकाळी सुहास सावंत, सखाराम सावंत, शशांक सावंत, नीतेश सावंत, राजेश सावंत व विश्वास देसाई हे मित्रमंडळी दरवर्षी सिद्धेश्वर येथे एक रात्र मुक्काम करण्यासाठी म्हणून जात असत. यावेळीही हे मित्र आपल्या चारचाकी वाहनाने दाणोली बाजार येथे जेवणाचे साहित्य खरेदी करून आंबोली महादेवगड येथे पोहोचले. त्यांनी महादेवगड येथूनच खाली पारपोली गावाकडे जाणाऱ्या दरीतील पायवाटेने मार्गक्रमण सुरू केले.

विश्वास हे पायवाट उतरत असताना पाय घसरून तोल गेल्याने सुमारे तीस फूट खाली खडकाळ दरीत ते कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी याबाबत आंबोली पोलिसांना माहिती दिली. सुमारे दीडशे फूट दरीतील रस्ता उतरल्यावर राजेश सावंत यांच्या मागे असलेला विश्वास देसाई यांचा पाय घसरला व तो तीस फूट खाली दरीमध्ये कोसळला. लागलीच त्याच्या मित्रांनी त्याला पायवाटेवरून खाली जात मोबाइल बॅटरीच्या उजेडमध्ये त्याचा शोध घेतला. त्यावेळी विश्वास हा एका झाडीमध्ये निपचित पडलेला आढळून आला.

यानंतर सुहास सावंत यांनी आपल्या इतर मित्रांना विश्वास जवळ ठेवून आंबोली पोलीस स्थानकात रात्री दहा वाजताच्या सुमारास याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास सावंत व कॉन्स्टेबल राजेश गवस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परंतु रात्रीच्या अंधारात बचाव कार्य करणे शक्य नसल्याने आज सकाळी मोहीम राबवून विश्वासचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.