मेहुल चोक्सीचा सहकारी दीपक कुलकर्णीला कोलकत्ता विमानतळावर अटक

कोलकत्ता : वृत्तसंस्था – पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी देशाबाहेर पळाले. अशात ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने मेहुल चोक्सीचा सहकारी दीपक कुलकर्णीला कोलकत्ता विमानतळावर अटक करण्यात आली आहे. हाँगकाँगहून दीपक कुलकर्णी परतला होता तो कोलकाता विमानतळावर येताच त्याला ईडीने अटक केली.

मंगळवारी त्याला कोर्टात हजर करण्यात येईल असे ईडीने म्हटले आहे. दीपक कुलकर्णीची ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला मुंबईला आणण्यात येईल कारण याप्रकरणातील तक्रार मुंबईत दाखल करण्यात आली आहे. मेहुल चोक्सीच्या विविध व्यवसायांशी दीपक कुलकर्णी संबंधित आहे. तसेच कर्ज बुडवेगिरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातल्या मुख्य आरोपींपैकी तो एक आहे, असे ईडीने म्हटले आहे.

दीपक कुलकर्णी हाँगकाँग मध्ये असलेल्या एका डमी फर्मचा संचालक आहे. ही फर्म मेहुल चोक्सीशी संबंधित आहे असेही समजते आहे. त्याच्याविरोधात नॉन बेलेबल वॉरंटही जारी करण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाºयांनी म्हटले आहे. तसेच त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे. आता त्याच्या चौकशीतून काय काय सत्य बाहेर येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.