राष्ट्रवादीच्या अटकेत असलेल्या नगरसेवकाची पालिकेच्या सभेत हजेरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दीपक मानकर मोक्का अंतर्गत अटकेत आहेत. अटकेनंतर त्यांची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली होती. अटकेत असणाऱ्या मानकरांनी महापालिकेच्या मुख्य सभेत हजेरी लावली. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

सहा महिने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजर न राहिल्यास त्या नगरसेवकाचे नगरसेवक पद कायद्यानुसार रद्द होते. त्यामुळेच या सभेला जाण्यासाठी संमती मिळावी असा अर्ज दीपक मानकर यांनी केला होता. आजच्या सभेलाही मानकर उपस्थित नसते तर त्यांचे नगरसेवकाचे पद रद्द होऊ शकत होते. कारण गेल्या सहा महिन्यांपासून मानकर मोक्का अंतर्गत अटकेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सभांनाही ते हजर नव्हते. त्यामुळेच त्यांनी दोन दिवसांसाठी पॅरोल अर्ज केला होता.

दरम्यान, न्यायालयाने मानकरांचा पॅरोल अर्ज मंजूर केला. त्यामुळे मानकर पुणे महापालिकेच्या सर्व साधारण सभेला दुपारी तीन वाजताच्या सुमारास हजर होते.