आंदोलनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा दिल्लीत झाला मृत्यू

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकरी आंदोलनासाठी आलेल्या शेतकऱ्याचा दिल्लीतील पहाडगंज भागातील आंबेडकर भवनात तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला आहे. करण संत (वय ४५)  असे मृत्यू झालेल्या शेकऱ्याचे नाव असून ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्याचे रहिवासी होते. त्यांच्या  मृत्यूचा तपास पोलीस करत आहेत असे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमित शर्मा यांनी म्हणले आहे.

काल  ३० नोव्हेंबर रोजी संसद भवनावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेर्तृत्व अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी या नेत्यांनी केले होते. या मोर्चात जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, मेजर जनरल (निवृत्त) सतबीर सिंग या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, जम्मू आणि काश्मीर,आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू,केरळ, तेलंगण, मेघालय या राज्यांतील दोनशेहून अधिक शेतकरी आणि शेतमजुरांच्या संघटना या मोर्चात सहभागी झाले होते. संपूर्ण कर्जमाफी, उत्पादनाच्या दीडपट हमीभाव या प्रमुख मागण्यासाठी शेतकऱ्यांनी संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला होता.

करण संत हे या मोर्चात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर वरून दिल्लीला आले होते. त्यांचा पहाडगंज येथील आंबेडकर भवनच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. काल संसद मार्गावर ‘अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती’ च्या वतीने झालेल्या  सभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी ,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद कजरीवाल यांनी सहभाग घेऊन सरकारच्या विरोधात आक्रमक भाषणे केली होती. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कोल्हापूर भागातील शेतकरी दिल्लीच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यातील एक करण संत असावे असे दिल्लीत बोलले जाते आहे. करण संत यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दिल्ली पोलीस या घटने बाबत अधिक तपास करत आहे.