पुण्यात 25 हजाराची लाच घेणार्‍या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे रेल्वे स्टेशन समोरील होमलँड हॉटेलच्या समोर 25 हजाराची लाच घेणार्‍या दिल्‍ली पोलिस दलातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रंगेहाथ पकडले आहे. न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर ते वॉरंट बजाविण्यासाठी दिल्‍ली पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी तक्रारदाराकडे पैशाची मागणी केली आणि गोत्यात आले.
लेहरीसिंग लिलासिंग (54, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, नेमणूक :- चित्‍तरंजन पार्क पोलिस स्टेशन, सेंट्रल प्रोसेसिंग सर्व्हिस पूल साईथ ईस्ट, डिस्ट्रिक्ट, नवी दिल्‍ली) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार हे पुण्यातील राहणारे असून त्यांच्याविरूध्द नवी दिल्‍ली येथील मेट्रोपोलिटन न्यायालयाकडून प्रोक्‍लेमेशन वॉरंट (सीआरपीसी 82) काढण्यात आले होते. ते वॉरंट तक्रारदार यांना बजाविण्यासाठभ लेहरीसिंग हे पुण्यात आले होते. त्यांनी वॉरंट न बजाविण्यासाठी तक्रारदाराकडे 40 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी पुणे रेल्वे स्टेशन समोर सापळा रचला. सहाय्यक उपनिरीक्षक लेहरीसिंग यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदाराकडून 25 हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई चालु असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.