इथे मुलींना लठ्ठ बनवण्यासाठी केले जातात असे काही प्रकार !

नैरोबी : वृत्तसंस्था – झिरो फिगर ठेवण्यासाठी तरुणी नाना प्रकारचे उपाय करतात. जिमला जातात. वेगवेगळ्या प्रकारे डाएट फाॅलो करतात. अनेक मुलांचीही अशी इच्छा असते की, त्यांना एक सुंदर, सडपातळ म्हणजेच झिरो फिगर असणारी मुलगी पत्नी म्हणून मिळावी. अनेकदा मुलींच्या आई देखील आपल्या मुलींचे वजन वाढले की लगेच काळजी करायला सुरुवात करतात आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करायला मदत करतात. परंतु आफ्रिकेत यापेक्षा अगदीच उलट चित्र पाहायला मिळत आहे. इथे मोठ्या संख्येने तरुणांना लठ्ठ तरुणीच पत्नी म्हणून हवी असते. त्यामुळे तेथील माता अहमहमिकेने मुलीला लठ्ठ बनवण्यासाठी हरेक उपाय करीत असताना दिसून येतात ! वाचून थोडं विचित्र वाटत असेल परंतु हे अगदी खरं आहे.

मुलींना लठ्ठ करण्यासाठी इथे चक्क दोन महिन्यांचा ‘फिडिंग सिझन’ असतो. सौंदर्य आणि लठ्ठपणाची सांगड घातल्याने तिथे अगदी 11 वर्षांच्या मुलीलाही दिवसाला 16,000 कॅलरीज असलेले पदार्थ खाऊ घालतात. यात 11 वर्षांच्या किंवा नुकत्याच वयात आलेल्या मुलींना त्यांच्या आया घेऊन येतात. प्रत्येक मुलीसाठी एक तंबू उभारण्यात येतो. दोन महिने आई व मुलीचा या तंबूत मुक्‍काम असतो.

दोन महिन्यांच्या ‘फिडिंग सिझन’ मध्ये एक वेगळीच प्रथा पाहायला मिळते. या दरम्यान आई मुलीला खीर व प्रोटिन्सयुक्‍त आहार देते. आई मुलीला दररोज एक लिटर उंटाचे दूध पिण्यास भाग पाडते. तसेच इतर हाय कॅलरीज अन्‍न ही मुलींच्या घशात अक्षरश: कोंबले जाते. यामुळे अनेकदा मुलींना उलट्या होतात, पोटात दुखते; पण तरीही मुलींना बळजबरीने खावे लागते. मुलींनी खाण्यास नकार दिला तर आई त्यांना कोवळ्या बांबूने झोडपून काढते.

जर मुलगी गरीब घरातील असेल तर तिला एवढे हाय कॅलरीज अन्‍न देणे आईला शक्य होत नाही. अशावेळी जनावरांना वजन वाढवण्यासाठी देण्यात येणारी केमिकल या मुलींना दिली जातात. या केमिकलमध्ये स्टेरॉईड असल्याने शरीर फुगून किडनी निकामी होऊन व हृदयविकाराचा झटका आल्याने अनेक मुलींचा मृत्यूही होतो. तरीदेखील अनेक मुली अशा प्रकारच्या जबरदस्तीला बळी पडतातच.