उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्तांचे तडकाफडकी निलंबन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या औरंगाबाद विभागाच्या उपायुक्त संगीता दरेकर यांना बुधवारी रात्री तडकाफडकी निलंबित केले. त्यांच्या निलंबन आदेशाची गुरुवारी अंमलबजावणी करण्यात आली. दरेकर यांची खातेनिहाय चौकशी आदेशित करण्यात आल्याचे निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आले. निलंबित केल्याचे कळताच दरेकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सूत्रांनी सांगितले की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या औरंगाबादच्या उपायुक्तपदी संगीता दरेकर या दीड वर्षापासून कार्यरत होत्या. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे नियंत्रण त्यांच्या कार्यालयातून होते. दरेकर यांच्या निलंबनाचे आदेश गृहविभागाने बुधवारी सायंकाळी काढले. या आदेशामध्ये दरेकर यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश शासनाने दिले आहेत. आदेशानुसार दरेकर यांच्या पदाचा चार्ज पुण्याचे उपायुक्त अर्जुन ओव्हळ यांच्याकडे सोपविण्यात आला.

दरेकर यांच्याविरोधात नेमक्या काय तक्रारी शासनाकडे होत्या, हे मात्र समजू शकले नाही. औरंगाबादला रुजू होण्यापूर्वी त्या कोल्हापूर येथे कार्यरत होत्या. उपायुक्त दरेकर यांच्यासोबतच सोलापूर येथील एका जवानालाही निलंबित करण्यात आले. उपायुक्त दरेकर आणि सोलापूर येथील जवान यांच्या निलंबनाचा केवळ संयोग आहे अथवा दोघांच्या निलंबनाचे वेगवेगळे कारण आहे. हे मात्र समजू शकले नाही.

उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी कोण करणार हे मात्र समजू शकले नाही. याविषयी दरेकर यांची प्रतिक्रियाही समजू शकली नाही.