खरंच मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंना टाळले का ?, सोलापुरात चर्चेला उधान

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात असताना ही वेळ साधत संभाजी भिडे हे त्यांना भेटण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री ज्या रूममध्ये बसले होते. तेथे संभाजी भिडे जाऊन बसले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याने ते आतल्या रूममध्ये बोलण्यासाठी निघून गेले. बराच वेळ भिडे यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ताटकळावे लागले.

तिकडे पंतप्रधान बिदरवरून विमानाने होम मैदानावर येत असल्याचा निरोप आल्याने ते तडकच दुसऱ्या मार्गाने राज्यपालांच्या रूममध्ये येऊन त्यांच्या समवेत एकाच गाडीत बसून होम मैदानाकडे मार्गस्थ झाले. दरम्यानच्या काळात संभाजी भिडे हे राज्यपालांची भेट घेऊन सभा स्थळाकडे निघून गेले.

सकाळी ९ वाजून ४५ मिनिटाच्या आसपास मुख्यमंत्र्यांचे सोलापूर विमानतळावरून कारने शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. चहापानानंतर ना. चंद्रकांत पाटील हे सभेच्या तयारीकरीता पार्क मैदानाकडे रवाना झाले. त्यानंतर काही वेळाने खा. शरद बनसोडे हे एकटेच मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शासकीय विश्रामगृहात आले. दोन मिनिटात त्यांच्याशी भेट घेऊन तेही सभास्थळी निघून गेले. त्यानंतर राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हेही विमानतळावरून कारने शासकीय विश्रामगृहात आले. याठिकाणी त्यांना पोलिसांकडून सलामी देण्यात आली.

चहापानानंतर २० ते २५ मिनिटानंतर मुख्यमंत्री व राज्यपाल एकाच कारमध्ये बसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी होम मैदानाकडे मार्गस्थ झाले.