ढाबा चालकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – जुन्या वादातून एका ढाबा चालकाचा धारदार शस्त्राने सपासप वार करुन खून केल्याची घटना आज (मंगळवार) दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. सम्राट विजय निकम (वय- २७ रा. दत्तनगर, कडोली) असे खून झालेल्या ढाबा चालकाचे नाव आहे. भर रस्त्यात घडलेल्या या सर्व प्रकाराने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेनंतर कोडोली, सिव्हिल येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सम्राट निकम हा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पेट्रोल पंपावरून निघाला होता. त्यावेळी एका टोळक्याने कोयत्यासह हॉकी स्टिक व इतर शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला. सम्राट याने हल्लेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोर एकामागोमाग सपासप वार करत असल्याने त्याचा प्रतिकार कमी पडत होता. या हल्यात सम्राटला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला यामुळे तो जागीच कोसळला. हल्ल्यानंतर हल्लेखोर हत्यारे घटनास्थळी टाकून पळून गेले.

सातारा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सम्राट याला तात्काळ सिव्हिलमध्ये नेण्यात आले, यावेळी त्याला मृत घोषित करण्यात आले. निकम कुटुंबियांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व सिव्हिलमध्ये धाव घेतली. रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेऊन संशयितांचा शोध सुरू केला आहे.