भररस्त्यात नगरसेवकावर गोळीबार

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन – डहाणूचे नगरसेवक आणि डहाणू जनता सहकारी बँकेचे संचालक भावेश देसाई यांच्यावर रात्री गोळीबार करण्यात आला. लुटण्याच्या प्रयत्नातून हा गोळीबार झाल्याचे समजते. या घटनेत ते सुखरुप असून किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिंसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच पुढील तपास सुरू केला आहे.

मंगळवारी रात्री ९ वाजता भावेश देसाई हॉटेल सरोवरच्या मागील रस्त्यावरुन दुचाकीने घरी जात असताना तेथे लपून बसलेल्या चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यावर स्प्रे मारून त्यांच्याजवळची बॅग हिसकण्याचा प्रयत्न केला. पण, देसाई यांनी आपली बॅग न सोडता चोरट्यांचा प्रतिकार केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावर पिस्तूल उगारुन गोळीबार केला.

या घटनेत बंदुकीची गोळी त्यांना स्पर्श करुन गेली. त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. बंदुकीच्या आवाजाने कुणी येऊ नये म्हणून चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर त्यांना तत्काळ शितल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सुखरूप आहेत. घटनेनंतर पोलीसांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व पुढील तपासाला सुरूवात केली आहे.