अहमदनगर सह धुळ्यात मतदानाची उत्साहात सुरुवात 

धुळे / अहमदनगर  : पोलीसनामा ऑनलाईन  – धुळे आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा मतदान कार्यक्रम आज सकाळी ७ वाजल्या पासून सुरु झाला. धुळ्यामध्ये आमदार अनिल गोटे यांनी ऐन निवडणुकीत वेगळी चूल उभारून भाजपासमोर मोठे आवाहन उभे केले असून राष्ट्रवादीची सत्ता टिकवण्यासाठी मोठी दमछाक होत आहे. तर तिकडे अहमदनगरमध्ये सेना भाजप प्रथमच वेळवेगळे लढत असून या दोन्ही पक्षांना काँग्रेस आघाडीने टक्कर दिली आहे. त्यामुळे नगरच्या निवडणुकीचा सामना तिरंगी लढतीत सुरु आहे.

अहमदनगरला पालिकेच्या ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. गत निवडणुकीत सेना भाजपा युतीला सत्ता कमावण्यात नगरमध्ये यश मिळाले होते. शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असा दोघांचा सत्तेत सहभाग होता. परंतु सेना भाजपमध्ये राज्याच्या सत्तेतून आलेले वितुष्ठ नगरच्या महानगर पालिका निवडणुकीत महत्वाचे ठरणार आहे. कारण दोघांच्या मतांचे ध्रुवीकरण होऊन त्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नगर शहराचे मागील काही दिवसांचे वातावरण बघता भाजप निवडणुकीच्या निकालात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतो परंतु सत्ता स्थापनेसाठी त्यांना शिवसेनेची मदत घ्यावीच लागेल असा मतप्रवाह सध्या नगरच्या राजकीय जाणकारांच्यामध्ये आहे. तर आम्ही स्वबळावर सत्ता मिळवू असा भाजपचा विश्वास आहे.

आपल्या कुशल नेतृत्वाच्या बळावर खानदेशातील पहिली महानगरपालिका जिंकण्याचा विक्रम जळगाव पालिकेच्या रूपाने मंत्री गिरीश महाजन यांनी करून दाखवला. गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर पक्षाने विश्वास टाकून त्यांच्याकडे धुळे महानगर पालिकेची जबाबदारी सोपवली. परंतु या ठिकाणी महाजन भाजपचे स्थानिक आमदार अनिल गोटे यांना विश्वासात घ्यायला कमी पडले किंबहुना त्यांना ते महत्वाचे वाटले नाही म्हणून त्या ठिकणी पक्षपुटीच्या बंडखोरीला भाजपला सामोरे जावे लागले. भाजपसाठी धुळ्यात वातावरण चांगले असले तरी अनिल गोटे सत्तेची गणिते हुकवण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला आपली सत्ता टिकवणे खूपच कठीण जाते आहे. धुळ्यात ७३ जागांसाठी ३५५  उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.

सकाळ पासून मतदान केद्रांवर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मोठ्या रांगा लावल्या आहेत. अद्याप दोन्ही शहरात कोणताच अनुचित प्रकार घडला नसून मतदान शांततेत पार पडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त मतदान केद्रांवर उभारण्यात आला आहे. दरम्यान धुळ्यात काल रात्री पैसे वाटत असल्याच्या संशयावरून दोन व्यक्तींवर चाकूने हल्ला केला असून या प्रकरणी आमदार गोटेंच्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.तर अन्य एक जणाला ४९ हजाराच्या रकमे सहित अटक करण्यात आली आहे. तर अहमदनगर मध्ये कसला हि गरबड गोंधळ झाला नसून लोक शांततेत मतदानाचा हक्क बजावत आहेत.