काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांमधील गटबाजीचा तरुण नेत्यांना फटका

भोपाळ: वृत्तसंस्था-आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुकांना तर महिना देखील उरला नाही असे असताना काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांची गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. या गटबाजीचा परिणाम म्हणून एका तरुण नेत्याची मुख्यमंत्रीपदाची वाट बिकट झाली आहे.

माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि माजी खासदार कमलनाथ यांच्या गटांमुळे तरुण नेते ज्योतिरादित्य सिंधियांची मुख्यमंत्रिपदाची वाट बिकट झाली आहे. तर दु सरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या रणनीतीमुळे सचिन पायलट यांचे स्वप्न पुन्हा भंगण्याची चिन्हं दिसत आहेत.

काय आहे वाद 

मध्यप्रदेश काँग्रेसचं तिकीट वाटप पूर्ण झालं आहे. पण यावेळी आमदारकीची ७५ तिकीटं दिग्विजय सिंह यांच्या समर्थकांना तर ५० तिकीटं कमलनाथ यांच्या समर्थकांना मिळाली आहेत. तरुण नेते खासदार ज्योतीरादित्य सिंधियांच्या गटाला फक्त ४५ तिकीटं मिळाली आहेत. यामुळे उद्या मध्यप्रदेशात काँग्रेस सत्तेत आल्यास दिग्विजय सिंह मुख्यमंत्रीपदाचा दावा करतील आणि १० वर्ष अहोरात्र काँग्रेससाठी काम करणाऱ्या सिंधियांची मुख्यमंत्रिपदाची वाट खडतर होईल. तिकीट वाटपादरम्यान दिग्विजय सिंह आणि ज्योतीरादित्य सिंधियांमध्ये भरपूर वादावादी झाली होती.

दुसरीकडे राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. यावेळी युवानेते सचिन पायलट काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी देखील मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. अशोक गेहलोत पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गेहलोत यांच्या समर्थकांची संख्याही राज्यात मोठी आहे. अशा परिस्थितीत अजमेरमधून आमदार म्हणून निवडून जाण्यापलीकडे सचिन पायलट यांच्याकडे काहीच मार्ग उरलेला नाही.

एकंदर ज्येष्ठ नेत्यांच्या गटबाजीमुळे युवा नेत्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न भंग पावताना दिसते आहे. तर दुसरीकडे या गटबाजीचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप करत आहे.