अंधांच्या चेह-यावरील आनंदात दिवाळी उजळून निघाली : इरफान सय्यद

पिंपरी | पोलीसनामा आॅनलाइन – सर्वसामान्यांचे दु:ख जाणून घेऊन त्याला शक्य होईल ती मदत करणे हीच खरी ईश्वराची सेवा आहे. अंधांच्या चेह-यावरील आनंदात माझी दिवाळी उजळून निघाली, असे मत साद सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.

आकुर्डी येथील श्री खंडोबा सांस्कृतिक भवन येथे दिवाळी फराळ वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पत्रकार अनिल कातळे, संजय सोलंकी, अतिश बारणे, हसनभाई शेख, डॉ. शाम अहिरराव, किसन बावकर, अरविंद सोलंकी, प्रमोद मामा शेलार, प्रदीप धामणकर, पांडुरंग कदम, आप्पा कौदरे, अमित जैन, जरीन शेख आदी उपस्थित होते. दिवाळी फराळ वाटपाच्या कार्यक्रमात एक हजार अंध कुटुंबियांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

दिवाळीत रेल्वे तिकिटांचा गैरव्यवहार करणाऱ्या ८९१ दलालांना अटक 

साद सोशल फांडेशनच्या वतीने गेली आठ वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. अंध कुटुंबियांना दिवाळी फराळ वाटप हे सामाजिक बांधिलकी म्हणून काम करत असताना सर्वात जास्त समाधान होत असल्याचे सांगून समाजातील विविध स्तरातील गरजूंना केलेली मदत हे खऱ्या अर्थाने समाजऋण फेडण्याचे काम आहे, असेही सय्यद यांनी सांगितले. अंध कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील पाहिलेला आनंद हा चिरकाल राहण्यासाठी साद सोशल फाऊंडेशनचे सर्व सहकारी सतत प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव कचरे यांनी केले. आभार प्रवीण जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. महेश शेटे, प्रवीण जाधव, परेश मोरे, राहूल कोल्हटकर, अनिल दळवी यांनी केले.