मते मागण्यास आलात तर याद राखा…, ‘त्या’ रहिवाशांचा उमेदवारांना इशारा  

श्रीगोंदा : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतशी निवडणुकीतील रंगत वाढत चालली आहे. इच्छुकांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू असतानाच आज शहरातील वार्ड क्र. ४ मधील एका भागातील काही मतदारांनी त्या भागात लावलेल्या एका फ्लेक्सबोर्डने सर्वांचेच लक्ष वेधले असून, या फलकाची शहरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

वार्ड क्र. ४ मधील वसुंधरा कलेक्शन लेनमधील रहिवाशांनी आमच्या कॉलनीमध्ये नगरपरिषदेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंत एकही रुपया खर्च केलेला नाही कोणतीच विकासकामे झालेली नाहीत, त्यामुळे नगरपरिषदेच्या आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांनी मते मागण्यासाठी येऊ नये, मते मागायला आल्यास अपमान केला जाईल, असा फ्लेक्सच रस्त्याच्या दर्शनी भागात लावला आहे.

या भागात विकासकामे न झाल्याने उमेदवारांना आता मते मागण्याचा अधिकार नाही, नगरपरिषद पदाधिकाऱ्यांना निवडणुका जवळ आल्यावरच मतदारांची आठवण होते. एरव्ही मतदारांच्या समस्येकडे पदाधिकारी दुर्लक्ष करतात, त्यामुळे संतप्त भावनेतून असा फलक लावल्याची भावना काही मतदारांनी व्यक्त केली आहे. मतदारांच्या या अजब फतव्यामुळे सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.