माझ्याकडून ‘ती’ अपेक्षा ठेवू नका : प्रियंका गांधी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील प्रभारी प्रियंका गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवू नका असं सांगितलं आहे. इतकेच नाही तर, पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी मतदारसंघात जाऊन काम करा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. मुख्य म्हणजे यावरच सर्व निकाल अवलंबून असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रियंका गांधी यांच्या या वक्तव्यावरून त्या निवडणुकीच्या रणांगणात पूर्ण ताकदीनिशी उतरल्या असल्याचं दिसत आहे.
प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे सोमवारी (18 फेब्रुवारी) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षातून बाहेर काढण्यात येईल असा इशाराही दिला आहे.
यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, “मी या पदावर बसून कोणताही चमत्कार करु शकत नाही. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनीच पक्षाला मजबूत करण्याची गरज आहे. राज्यात पक्षाला बळ मिळावे यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे.” मतदारसंघांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याची बैठकीदरम्यान प्रियंका गांधी यांनी चाचपणी केली. तसेच कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहेत.
मी निवडणूक लढवणार नाही, पक्ष संघटना मजबूत करणार
काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारून राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांनी सुरुवातीपासूनच धडाकेबाज काम करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या पक्ष कार्यालयातील नेहरू भवनात त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर जवळपास १६ तास मॅरेथॉन बैठका घेतल्या होत्या. या बैठका पूर्ण रात्रभर सुरू होत्या त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना जेव्हा प्रियंका गांधी म्हणाल्या, माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कोणताही मुकाबला नाही. राहुल गांधीच मोदींना टक्कर देतील. तेव्हा प्रियंका यांना मोदींशी दोन हात करणार का ? असा प्रश्न विचारल्यानतंर त्या म्हणाल्या की, ” मी निवडणूक लढणार नाही. मोदींशी मी नव्हे, तर राहुल गांधी मुकाबला करतील.” असे त्यांनी स्पष्ट केले. मी निवडणूक लढवणार नाही, काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मतदारांना पुन्हा काँग्रेसकडे वळवताना प्रियंका गांधी यांची कसोटी लागणार 
प्रियंका गांधी यांच्या सक्रियतेनंतरही उत्तर प्रदेशात काँग्रेससमोर कठीण आव्हान असणार आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची संघटना खूपच कमकुवत आहे. असे असताना आता राज्यात आधीच भक्कम असलेला भाजपा आणि आता नव्याने झालेली सपा-बसपा महाआघआडी यांना शह देण्यासाठी प्रियंका गांधी यांना मोठ्या प्रमाणावर पक्ष बांधणीचे काम हाती घ्यावे लागणार आहे. 2022 साली होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार करण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू असल्याची चर्चा आहे असेही समजत आहे.