त्वचा रोग तज्ज्ञाच्या एमबीबीएस मुलीची आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाण्यातील प्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. कावेरी सोम यांच्या एमबीबीएस मुलीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेमुळे ठाण्यामध्ये खळबळ उडाली असून तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. ही घटना आज सकाळी घडली. शर्मिष्ठा सोम असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ति काही दिवसांपासून तणावात होती. याच् तणावातून तिने आत्महत्या केल्याचे सुत्रांनी सांगितले.

ठाण्याच्या कोलशेत येथील एव्हरेस्ट इमारतीत सोम कुटुंब राहतं. आज सकाळी कावेरी सोम यांची कन्या शर्मिष्ठा सोम यांनी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. शर्मिष्ठा यांनी आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याने ठाण्यात खळबळ उडाली.

शर्मिष्ठा या एबीबीएस असून तणावाखाली असल्यानं तिने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं. शर्मिष्ठाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केवळ अभ्यास न झाल्यामुळे तणावाखाली तिने हे पाऊल उचलले असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.