कुत्र्याचा उत्साह मालकाला पडला महागात

चीन : वृत्तसंस्था – काही पाळीव प्राणी असे असतात की, आपण त्यांच्यावर प्रेम केले असता, तेही आपल्यावर प्रेम करीत असतात. तसाच एक कुत्रा असा प्राणी आहे, की तो आपल्या मालकाशी कायम प्रामाणिक असतो. तो नेहमीच आपल्या मालकांचे ऐकतो. अनेक गोष्टींमधूनही आपल्याला त्याचे दाखले मिळतात. पण एका कुत्र्याने असे काही केले आहे, जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, कुत्रे अनेकदा आपल्या मालकाला पाहून खुश होतात. मालकाने जवळ घेतल्याशिवाय किंवा प्रेमाने हात फिरवल्याशिवाय ते शांत होत नाहीत.

तसाच एका मालकाला त्याच्या कुत्र्याचा हा उत्साह सरळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आहे. खरे तर या मालकाने हस्की ब्रीडचा कुत्रा पाळला आहे. हा कुत्रा मालकाला पाहून एवढा उत्साही झाला की, सरळ दुसऱ्या मजल्यावरून त्याने उडी मारली. पण याची शिक्षा मात्र मालकालाच मिळाली. कुत्रा सरळ खाली उभा राहिलेल्या मालकावर येऊन पडला ज्यामुळे मालकाची मानच मोडली. चीनमधील यॉंगझोऊ शहरामध्ये राहणाऱ्या 67 वर्षीय लियू सध्या हॉस्पिटमध्ये उपचार घेत आहे. गेल्या आठवड्यात ही घटना घडली. लियू आपल्या कुटुंबातील काही व्यक्तींसोबत घरी येत होते. घरामध्ये दुसऱ्या माळ्यावर त्यांचा कुत्रा होता. त्यांना पाहून त्याने भुंकण्यास सुरुवात केली. ते दरवाजा उघडणार तेवढ्यात कुत्र्याने दुसऱ्या मजल्यावरूनच मालकाच्या अंगावर उडी घेतली. त्यामुळे लियू यांची मान तर मोडलीच पण ते जागेवर बेशुद्ध पडले. तत्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

जेव्हा लियू शुद्धीवर आले ,तेव्हा ते म्हणाले की, हे सर्व एवढ्या पटकन घडले की, मला काही समजलच नाही. घरातील एखादी वस्तू त्यांच्या अंगावर पडल्याचे त्यांना वाटत होते. त्यांचाच 60 पाउंडवजनाचा कुत्रा त्यांच्या अंगावर पडल्याचे त्यांना समजतच नव्हते. या प्रकारामुळे लियू यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना सर्जरी करावी लागली. दरम्यान, या प्रकारामध्ये कुत्र्याला काहीच दुखापत झाली नाही. लियूदेखील घडलेल्या प्रकारासाठी कुत्र्याला दोषी मानत नाहीत. ते म्हणतात की, ‘तो एक मुका प्राणी असून त्याला काहीच समजत नाही. आपण सांगू, शिकवू तसे ते वागतात. जे घडलं त्यामध्ये त्याचा काहीच दोष नाही. मला आता लवकरत बरं व्हायचे आहे.