‘या’ जाचक अटींमुळे शैक्षणिक सहली होणार बंद ?

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – राज्याच्या शिक्षण विभागाने सहलींसाठी तयार केलेली जाचक अटींची नियमावली पाहिली तर यापुढे शाळांच्या सहली बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षण विभागाने शाळांच्या सहलींसंदर्भात तयार केलेल्या नियमामध्ये, अपघात होतील अशा निसर्गरम्य स्थळी सहल काढू नये, सहल नेणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी १००/- रुपयांच्या बाँडवर हमीपत्र लिहून द्यावे, सर्व विद्यार्थ्यांचा विमा उतरल्याच्या प्रती परवानगीसोबत जोडाव्यात, आदी जाचक अटी घातल्या आहेत.

तसेच सहलीस जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रक्तगटाची माहिती परवानगीसोबत जोडावी, सहलीस जाणारी मुले शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याची वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडावी, आदी अटी लादल्याने शैक्षणिक सहलींकडे शाळाच दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. शासनाने लादलेल्या या अटी पाहता मुख्याध्यापकांसह शिक्षक वर्गात नाराजी पसरली आहे. कोणते मुख्याध्यापक शंभर रुपयांच्या बाँडवर लिहून देऊन सहली काढतील? असा सवाल विचारला जात आहे. निष्काळजीपणे सहल घेऊन जायला मुख्याध्यापक व शिक्षक मुलांचे शत्रू नाहीत. स्वत:च्या मुलांपेक्षा जास्त ते शाळेतील मुलांची काळजी करतात.

अपघात काय ठरवून होतात का ? अपघात कोणत्याही ठिकाणी होऊ शकतात? असे प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केले आहे. सहलीची परवानगी घेताना घातलेल्या अटी पाहिल्या तर कोणीही सहल काढण्याचे धाडसच करणार नाही. त्यामुळे सहल नावाच्या शालेय जीवनातील आनंदाला विद्यार्थी मुकणार असेच चित्र आहे. तर शाळांनी सहल काढू नये एवढे एका ओळीचे पत्रक काढले तरी सर्वांची सुटका होईल. नाही तरी नियम घालून हेच करायचे आहे. तसेच मुलांना सहलीवर निबंध, पत्रलेखन यावर प्रश्न येणार नाहीत, याचीही सूचना शासनाने द्यावी, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.