पोट्याच्या यात्रेत जखमी झालेल्या पैलवानाचा मृत्यू…

हिमायतनगर : पाेलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड)  मागील अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या पोट्याच्या दत्तात्रेय यात्रा उत्सव कुस्त्यांच्या फॅडमुळे गाजत असून, यंदा याच कुस्तीच्या फडामध्ये एका पैलवानास आपला जीव गमवावा लागल्याने नावारूपाला आलेल्या यात्रेला या घटनेने गालबोट लागले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा येथील प्रसिद्ध दत्तात्रेय यात्रा उत्सवाला शानदार सुरुवात बुधवारी पालखी मिरवणुकी करून झाली. तीन दिवसाच्या यात्रेतील दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कुस्त्यांच्या फडमध्ये नांदेड जिल्ह्यातील शेकडो पैलवानांनी गाजून काढला. दरम्यान दि.२७ गुरुवारी हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ येथील अनिल माधव राजेवाड वय १८ वर्षीय पैलवान प्रतीस्पर्धी पैलवानसोबत कुस्ती खेळताना गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्यास तात्काळ उपचारासाठी भोकर येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तेथून नांदेडला उपचारासाठी हलविण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना दि.२९ रोज शनिवारी दुपारी एक वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

मजुरी करून आपल्या आई – वडिलांसह लहान भावाचा उदरनिर्वाह करणारा हा घरातील करता युवक होता. हा युवक कुस्त्यांच्या फडात गंभीर जखमी झाल्याचे कळताच गावातील लोकांनी निधी जमा करूंन त्यास रुगालयात भरती केले होते. परंतु नियतीला हे पसंत आले नाही. आणि कुस्तीचा नाद असलेल्या अनिलला आपला जीव गमवावा लागला. कदाचित घरची परिस्थिती चांगली असली असती तर अनिलचे प्राण वाचले असते असे अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांसह अनेकांनी बोलून दाखविले. या घटनेमुळे हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ गावावर शोककळा पसरली आहे.