भगर खाल्ल्याने 80 जणांना विषबाधा

बीड : पोलीसनामा ऑनलाईन- बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात अन्नातून ८० जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळते आहे. रस्त्यावर फिरून विक्री करणाऱ्या भगर विक्रेत्याकडून तालुक्यातील दुकानदारांनी भगर खरेदी केले होते. गुरुवारी एकादशी असल्याने उपवास असणाऱ्यांनी ही भगर खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याची माहिती मिळते आहे. विषबाधा झालेल्यांवर माजलगाव आणि बीडच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

गुरुवारी एकादशी असल्याने या दिवशी घरोघरी त्याचा उपवास केला जातो. तालुक्यातील उमरी, छत्र बोरगाव, कोथरुळ, रोशनपुरी आदी गावात आठ दिवसांपूर्वी एका फिरस्ती भगर विक्रेत्याकडून गावातील दुकानदारांनी भगर खरेदी केली होती. गुरुवारी एकादशी दिवशी उपवास करणाऱ्यांनी भगर खाल्ल्याने त्यांना उलट्या-मळमळ असा त्रास होऊ लागला. एकट्या उमरी गावात जवळपास पन्नास महिला व पुरुषांना तर रोशनपुरी, छत्र बोरगाव, कोथरुळ या गावातील तीस जणांना असाच त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात तसेच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांची वाढती संख्या पाहता काहींना जिल्हा रुग्णालयात बीड येथे पाठवण्यात आले आहे.