शिक्षणमहर्षी डाॅ. पंजाबराव देशमुख यांची १२० वी जयंती उत्साहात संपन्न

निंबा : पोलीसनामा ऑनलाइन – निंबा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री तसेच विदर्भातील कान्याकोपऱ्यात शिक्षणाचे जाळे निर्माण करणारे शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचा १२० व जयंतीउत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. सहा दिवसीय स्नेहसंमेलनाची सुरवात दि २५ पासून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. गजानन पुंडकर यांच्या अध्यक्षते मध्ये आणि बढे डीन कोकण विद्यापीठ यांच्या हस्ते स्व श्रीधरराव देशमुख यांच्या पुतळ्याचे व डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या छायाचित्रांचे पूजन करून करण्यात आले.

पहिल्या दिवशी शाळेने अभिनव उपक्रम राबवून इथे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यामध्ये विविध क्षेत्रातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण, महसूल, पोलीस , महामंडळ, भूमिअभिलेख, पत्रकार, व्यावसायिक अश्या सर्व प्रकारच्या पदसिद्ध विद्यार्थ्यांना संपर्क करून आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी विविध माजी विद्यार्थ्यांनी 40 वर्षानंतर आपल्या शाळेला भेट देऊन जुन्या सवंगड्याची सुद्धा भेट घेतली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यासोबतच श्री शिवाजी विद्यालय निंबा येथील सर्व माजी शिक्षक ज्यांनी शाळेच्या पाहिल्या सत्रापासून कार्य करून या शाळेच्या उभारणीस व विद्यार्थ्यांच्या पायाभरणीमध्ये योगदान दिले. अशा सर्व माजी शिक्षकांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी निंबा गावामध्ये ज्ञानदिंडी प्रभातफेरी चे आयोजन करून ‘शिक्षणाचे महत्त्व’ चा प्रचार करण्यात आला. यासोबतच विविध सांघिक व मैदानी क्रीडा खेळाच्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या होत्या.

विद्यार्थ्यांना कला व वैचारिक गुणांना वाव मिळावा यासाठी चित्रकला स्पर्धा, पाककला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी निबंध स्पर्धा, संगीत खुर्ची, स्वयंशाशन विद्यालय आशा विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित केल्या होत्या.

विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व एकपात्री नाटकामध्ये हिरीरीने सहभाग घेऊन कलागुणांचे सादरीकरण केले.